लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन देणग्यांमध्ये 180 टक्क्यांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे रोखीचे व्यवहार कमी आणि ऑनलाईन व्यवहार जास्त सुरू आहेत. ऑनलाईन व्यवहारासह ऑनलाईन देणग्यांमध्येही 180 टक्के वाढ झाली आहे. ‘रेझरपे’ या आर्थिक सुविधा पुरविणाऱ्या संस्थेने ‘दी एरा ऑफ रायझिंग फिनटेक’ या अहवालाची पाचवी आवृत्ती प्रकाशित केली. जगभर कोविड-19 चा हैदोस सुरू असताना आणि देशात लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय लॉकडाऊन दरम्यान डिजीटल पेमेंटवर काय परिणाम झाला याविषयी या अहवालात माहिती देण्यात आली आहे.

रेझरपेच्या माध्यमातून 24 फेब्रुवारी ते 23 मार्च (लॉकडाऊन पूर्व) आणि 24 मार्च ते 23 एप्रिल (लॉकडाऊन दरम्यान) झालेल्या व्यवहारांबाबत माहिती।देण्यात आली आहे. सर्वसामान्य लोक घरातच अडकल्याने बील भरणे सारख्या उपयुक्त सुविधा क्षेत्रात 73 टक्के, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात 32 टक्के, आणि प्रसारमाध्यमे व मनोरंजन क्षेत्रात 25 टक्के वाढ झाली आहे. तर लॉजिस्टीक क्षेत्रात तब्बल 96 टक्के घसरण झाली. पर्यटन क्षेत्रात 87 टक्के, रिअल इस्टेट मध्ये 83 टक्के, अन्न आणि पेय क्षेत्रात 68 टक्के आणि किराणा क्षेत्रात 54 टक्के घट झाली.

स्वयंसेवी संस्थांना लॉकडाऊन दरम्यान मदत करण्याचा ओघ दिसून आला. सामाजिक संस्थांना ऑनलाईन देणगी देण्याच्या व्यवहारात 180 टक्के वाढ झाली. बाधित व्यक्तींना मदत करण्यास सर्वसामान्य नागरिकांचा भरभरुन पाठिंबा मिळत आहे हेच यातून प्रतित होत आहे.