अ‍ॅब्युलन्समधुन दारु वाहतूक करणारे गजाआड; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरामधील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच रुग्णवाहिकेत दारुचा साठा ठेवून त्याची दुचाकीवर विक्री करण्याचा प्रकार बुधवारी उघड झाला आहे. या प्रकरणी तिघांविरुध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालय परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ दुचाकीवर दारुची वाहतुक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथक रुग्णालयातील परिसरामध्ये गेले असता त्यांना अ‍ॅक्सेस मोपेड घेऊन दोघेजण येताना आढळले. त्यांच्याकडे चौकशी दरम्यान दारुच्या बाटल्या आढळून आल्या. वीरु प्रकाश गोहेर (वय 33, रा.सिव्हील कॉर्टर), रॉबीन जॉर्ज कोरेरा (वय 20, रा.सिव्हील कॉर्टर), संजय गंगाराम हंकारे (वय 56, रा.रासनेनगर) यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, पोलिसांनी जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये चौकशीसाठी आले. यावेळी सुझुकी अ‍ॅक्सेस मोपेडवरुन जाणार्‍या दोघांना थांबवून चौकशीदरम्यान त्याच्याकडे दारुच्या बाटल्या आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता त्यांनी संजय हंकारे यांचेकडून दारुचा माल विकत घेतला असून त्यांने अ‍ॅब्युलन्समधून माल काढून दिला. तसेच त्याच्याकडे अजूनही दारुचा बॉक्स आहे अशी माहिती दिली. यानंतर दुचाकवरील दोघांना ताब्यात घेत, पोलिसांनी अ‍ॅब्युलन्सची झडती घेतली असता त्यात मास्टर ब्लेंड कंपनीच्या विदेशी दारुच्या बाटल्यांचा एक बॉक्स आढळून आला व मास्टर ब्लेंड कंपनीच्या 180 मिलीच्या सिलबंद बाटल्या आढळल्या. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सचिन उत्तम जगताप यांच्या फिर्यादीवरुन या तीन आरोपींविरुध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किरण सुसरे, पोसई कृष्णा घायतडक, पोसई समाधान सोळंके, तसेच तोफखाना पोलीस स्टेशन व तोफखाना पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस कर्मचार्‍यांनी केली.