
बीड जिल्ह्यातील खरीप हंगामापूर्वी सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे विद्युत दुरुस्ती व ट्रान्सफॉर्मर वेळेवर उपलब्ध करून देऊन पावसाळ्याआधीची दुरूस्ती आणि देखभालीची कामे त्वरित सुरू करावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. खरीप हंगाम सुरू होणार असून त्यापूर्वी अनेक ठिकाणचे ट्रांसफार्मर जळालेले आहे. ते तातडीने दुरुस्त करून ठेवण्यात यावेत जेणेकरून खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होईल असं क्षीरसागर यांनी म्हटले. जळालेले ट्रान्सफार्मर वेळेत दुरुस्त न झाल्याने अनेकदा शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे या समस्येकडे उर्जामंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती क्षीरसागर यांनी केली आहे. सध्याची देखभाल-दुरुस्तीची कामे संथगतीने होत असून त्यासाठी योग्य प्रमाणात साहित्य उपलब्ध होत नाहीये ही बाबही क्षीरसागर यांनी उर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.





























































