
परभणी जिल्हयातील सेलू शहरातील राज मोहल्ला येथील रहिवाशी असलेल्या 55 वर्षांच्या महिलेवर संभाजीनगर येथे काही आजारांवर उपचार सुरू होते. त्यासाठी तेथे काही दिवसांपासून ती दाखल होती. ही महिला 27 एप्रिल रोजी सकाळी खाजगी वाहनाने सेलू येथे परत आली होती. त्यानंतर 28 एप्रिल रोजी ही महिला सेलूतून परभणीतील खाजगी दवाखान्यात गेली होती. तेथील उपचारानंतर नांदेड येथे गेली होती. नांदेड येथील वैद्यकीय पथकाने महिलेचे स्वॅब घेतले असता तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्या महिलेवर नांदेड येथे औषधोपचार सुरू आहेत. संबधित रुग्णाच्या सहवासातील सेलू येथील 27 व परभणी खाजगी रुग्णालयातील 24 असे एकुण 51 संशयितांचे स्वॅब घेण्यात येऊन त्यांना उपजिल्हा रुग्णालय सेलू व जिल्हा रुग्णालय परभणी येथे दाखल करुन घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गुरुवारी सांयकाळी 5 वाजेपर्यंत परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे 732 व गुरुवारी दाखल झालेले 71 असे एकूण 803 संशयितांची नोंद झाली आहे. तर परभणी जिल्हयात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.




























































