
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे 23 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 19 अहवाल निगेटीव्ह तर चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील एका व्यक्तीस मंगळवारी (28 एप्रिल) मयत अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते, त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. दरम्यान, आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 32 झाली असून प्रत्यक्षात 17 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण 697 नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 671 अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण 639 अहवाल निगेटीव्ह तर 32 अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व 26 अहवाल प्रलंबित आहेत. शुक्रवारी प्राप्त झालेल्या 23 अहवालात 19 अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
आता सद्यस्थितीत 32 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील चार जण मयत आहेत. तर गुरुवारी (23 एप्रिल) सात जण व सोमवारी (27 एप्रिल) एका जणास व गुरुवारी (30 एप्रिल) तिघांना असे 11 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत 17 जण उपचार घेत आहेत.
दरम्यान, ज्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला त्या व्यक्तीस मयत अवस्थेतच मंगळवार 28 एप्रिल रोजी रुग्णालयात आणले होते. त्याचा घशातील स्त्रावाचा नमुना घेऊन तो चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे. हा 56 वर्षीय व्यक्ती खैर महम्मद प्लॉट या भागातील रहिवासी असून तो फळ विक्रेता होता. अन्य एक रुग्ण 79 वर्षीय पुरुष असून तो रामदास पेठेतील टिळक पार्क जवळ राहणारा आहे. तर एक 66 वर्षीय महिला व 39 वर्षीय पुरुष हे दोघे या आधीच्या एका पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील असून ते कंवरराम सोसायटी येथील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली.


























































