मुंबईत रुग्णवाढ कायम; एकाच दिवसात 547 कोरोनाबाधित!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून गेल्या 24 तासांत नवीन 547 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकाच दिवसांत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 8172 वर पोहोचला असून एकूण मृतांची संख्याही 322 झाली आहे. दरम्यान, कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतही रुग्णवाढ कायम असून गेल्या दोन दिवसांत 127 तब्बल 12 नवीन रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत गेल्या चार दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. 29 आणि 30 एप्रिल रोजी अनुक्रमे 475 आणि 417 रुग्णांची नोंद झाल्यानंतर काल 1 मे रोजी रुग्णांचा आकडा तब्बल 751 पोहोचला. तर आज पुन्हा 547 रुग्णांची भर पडली. पालिका रुग्णालयांसह खासगी प्रयोगशाळांमध्ये केलेल्या 481 चाचणी अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येत 29 आणि 30 एप्रिल रोजीच्या 190 कोरोना चाचणी अहवालांचाही समावेश असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. दरम्यान, आजच्या 27 मृतांमध्ये 20 पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. शिवाय मृतांमधील 20 जणांना दीर्घकालीन आजार होते असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर मृतांमधील 12 जणांचे वय हे 60 वर्षांपेक्षा जास्त होते तर उर्वरित 15 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते.

धारावीत एकूण संख्या 496 वर

धारावीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून 1 मे रोजी 38 आणि 2 मे रोजी 89 रुग्णांची नोंद झाल्याने या ठिकाणच्या एकूण रुग्णांचा आकडा 496 वर पोहोचला आहे. धारावीत कोरोनामुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, माहीममध्ये गेल्या दोन दिवसांत 27 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे या ठिकाणची संख्या 52 वर पोहोचली आहे. तर दादरमध्ये गेल्या एकाच दिवसांत 13 नवीन कोरोनाबाधित आढळल्याने या ठिकाणची एकूण रुग्णसंख्या 46 झाली आहे.

137 जण कोरोनामुक्त

पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या एकाच दिवसांत 137 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांचा आकडा 1704 वर पोहोचला आहे.

अशी वाढतेय रुग्णसंख्या

– 25 एप्रिल 281 रुग्ण 12 मृत्यू
– 26 एप्रिल 324 रुग्ण 13 मृत्यू
– 27 एप्रिल 395 रुग्ण 15 मृत्यू
– 28 एप्रिल 393 रुग्ण 25 मृत्यू
– 29 एप्रिल 475 रुग्ण 26 मृत्यू
– 30 एप्रिल 417 रुग्ण 20 मृत्यू
– 1 मे 751 रुग्ण 5 मृत्यू
– 2 मे 547 रुग्ण 27 मृत्यू