
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात नूतन महाविद्यालयाच्या वसतिगृहात गेल्या 45 दिवसांपासून अडकून पडलेल्या मध्यप्रदेश मधील 7 मजुरांना आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपल्या गावी जाण्याची परवानगी मिळाली आणि सर्वांनाच अश्रूंचा बांध फुटला. यातील काही जणांनी तर हर्षोह्वासात नृत्यही केल्याने सर्वांचेच डोळे पाणावले. लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर लातूर येथून प्रवास करताना सेलू येथे 7 मजूर अडकले होते. यामध्ये बहुतांश जण हे वयाने जेष्ठ होते. 45 दिवस सेलू मध्ये काढल्यानंतर आज त्यांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळाली.
महाविद्यालयाने देखील त्यांना जेवण आणि गोडधोड करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना निरोप दिला. यावेळी त्या सर्वांना अश्रू आवरणे कठीण जात होते.






















































