
हिंगोली शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 मधील मुंबईहुन आलेल्या 22 जवानांना कोरोनाची लागण झाली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका 24 वर्षीय परिचारिकेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे रुग्णांची संख्या 76 झाली आहे. चार मे रोजी रात्री पावणे बारा वाजता ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे आरोग्य प्रशासनाने दिली आहे.
हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलातील 194 जवान व अधिकारी मुंबई व मालेगाव येथील बंदोबस्तावरून 19 व 20 एप्रिल रोजी जिल्ह्यात परत आले होते. त्यापैकी हिंगोलीच्या 68 तर जालना येथील एक अशा 69 जवानांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आजपर्यंत प्राप्त झाला आहे. जालन्याच्या जवानाच्या संपर्कातील दोन जणांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर वसमत व सेनगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. जिल्ह्याची रुग्ण संख्या रविवारी 3 मे पर्यंत 53 होती.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या 4 मे रोजी रात्री साडे अकरा वाजता प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार 22 एसआरपीएफ जवान कोरोना बाधित झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर एका परिचारिकेला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे रुग्णांची संख्या 76 इतकी झाली असून यापैकी एका रुग्णाने कोरोनावर मात केल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, मालेगाव येथुन आलेले 34 तर मुंबईहुन आलेले 35 जवान कोरोनाबाधित झाले आहेत. तर हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात श्वासोच्छ्वास घेण्यात अडचणी येत असल्याने एका जवानाला ऑक्सिजन लावण्यात आले आहे.






















































