
दारू विक्रीला अधिकृतपणे सुरुवात झाल्यानंतरही नगरमध्ये बेकायदेशीररित्या दारू विक्री करण्याचं सत्र काही संपताना दिसत नाही. राज्यात रुग्णवाहिकेतून दारूची ने-आण केल्या जात असल्याचं समोर आल्यानंतर आता नगरमध्ये चक्क स्कूल बसमधूनच दारूची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
लॉकडाऊनच्या काळातही बेकायदा धंदे सुरूच असून गुन्हेगार यासाठी वेगवेगळे फंडे वापरत असल्याचं नगरच्या या घटनेतून समोर आले आहे. इतर वाहनांना बंदी असल्याने रुग्णवाहिकेतून दारू विक्री केली जात असल्याचा प्रकार गेल्या आठवड्यातच उघडकीस आला होता. त्यानंतर आता हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय एकनाथ लोणारे याला अटक केली असून त्याच्याकडून दारू, व्हॅनसह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नगर ते कापूरवाडी रोडवर नागरदेवळे येथे तो स्कूल व्हॅनमधून दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही खबर मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा लोणारे हा स्कूल व्हॅनमधून दारू विक्री करत असल्याचे आढळून आले. व्हॅनमध्ये विदेशी मद्याच्या 36 बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.























































