परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी मागाठाण्यात आरोग्य शिबीर, शिवसेनेच्या उपक्रमाला प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे मुंबईत अडकून पडलेल्या परप्रांतीयांना सुखरूप घरी जाता यावे यासाठी मागाठाणे येथे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी या नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्यविषयक माहिती व प्रशिक्षणही देण्यात आले.

पोलिसांच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात पाच डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचारी हजर होते. या शिबिरात नागरिकांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. यामध्ये नागरिकांची आरोग्यविषयक सर्व प्रकारची तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रकृती ठीक असलेल्यांना फिटनेस प्रमाणपत्र आणि पोलीस ठाण्यात द्यायचा फॉर्मही देण्यात आला. तो भरण्याची माहितीही देण्यात आली. सुर्वे यांनी गेला महिनाभर माजी नगरसेविका संजना घाडी यांच्या समाजसेवी संस्थेच्या सहायाने सुमारे दीड लाख अन्नपाकिटांचे वाटप केले आहे. आता आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून दररोज एक हजार गरीब कुटुंबांना पाच किलो तांदूळ, एक किलो साखर व डाळ, दोन किलो कणीक, एक किलो चहा असा शिधा दिला जात आहे. हा उपक्रम महिनाभर सुरू राहणार आहे.

पाच दिवस उपक्रम सुरू राहणार
परप्रातीयांना प्रवासात आणि गावी गेल्यावर वावरताना कोरोनाची लक्षणे, त्यासाठी घ्यावयाची सावधगिरी, पोषक आहार, काय करावे आणि काय करू नये याची माहितीही तज्ञ व डॉक्टरांमार्फत या नागरिकांना देण्यात आली. यावेळी ४०० नागरिकांना फिटनेस प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे त्यांना बाहेरगावी जाणे सुकर होईल. यावेळी या नागरिकांना नाश्ता, जेवणही देण्यात आले. नागरिकांचा प्रतिसाद पाहता हे शिबीर आणखी पाच दिवस सुरू ठेवले जाणार आहे.