
जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. कोरोनाच्या या संकटात देखील आयटी क्षेत्रातील कंपन्या ‘वर्क फ्रॉम होम’ तत्त्वावर सुरू राहिल्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ही परिस्थिती निवळण्यास सप्टेंबर महिना उजाडू शकतो. त्यामुळेच आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘ट्विटर’ने सप्टेंबरपर्यंत कंपनीचे ऑफिस सुरू करण्यात येणार नाही असे जाहीर केले आहे. त्यामुळेच लॉकडाऊन उठल्यावर देखील आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. इतकेच नाही तर कुणाला कायमचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू ठेवायचे असल्यास तशी सोय करून देण्यात येणार आहे.
सॅन फ्रान्सिस्को येथील कंपनीच्या मुख्यालयातून ही माहिती देण्यात आली. जागतिक स्तरावरील या आरोग्य संकटाच्या काळात अशा प्रकारचा निर्णय घेणारी आम्ही पहिली कंपनी आहोत आणि अशा प्रकारचे धोरण आम्ही पुढेही अनिश्चित काळासाठी सुरू ठेवण्यात येणार आहे, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
अचानक उदभवलेल्या या संकटामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना ते असतील त्या ठिकाणाहून काम करू शकतील अशी सोय करून देणे, त्यांना सपोर्ट देणे याला आमचे प्राधान्य होते.
गेल्या काही महिन्यांपासून आम्ही कोणत्याही ठिकाणाहून विना अडथळा काम करू शकतो हे आम्ही दाखवून दिले आहे. अशा वेळी जर आमच्या कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होम यापुढेही अशाच पद्धतीने करायचे असल्यास त्यांना तशी परवानगी देण्यात येईल असे ही कंपनीच्या प्रवक्त्याने जाहीर केले.
जेव्हा सर्व परिस्थिती सामान्य होईल, तेव्हाच टप्प्याटप्प्याने काळजीपूर्वकरित्या ऑफिस पुन्हा सुरू करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले. ऑफिस सुरू करण्याचा निर्णय आमचा असेल आणि कर्मचाऱ्यांना जेव्हा केव्हा ऑफिसमध्ये यावेसे वाटेल ते येऊ शकतील.
काही अपवाद वगळता अन्य सर्व ऑफिस सप्टेंबर आधी सुरू होणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे.

























































