
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेचे तिकीट नाकारण्यात आल्यानंतर खडसे यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर तोफ डागून त्यांना हैराण करून सोडले आहे. खडसेंच्या या हल्ल्यांनी घायाळ झालेल्या भाजपने आता पक्षाची बदनामी थांबवण्यासाठी पुढे येण्यास सुरुवात केली आहे. पक्षाची बाजू मांडताना चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना तिकीट नाकरण्याच्या कारणांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याची प्रेरणा घेऊन भाजप काम करतो त्याच्या अजेंड्यात खडसे बसत नसल्यासंदर्भात विधान केले आहे. यामुळे वाद आणखी चिघळणार अशी शक्यता आहे.
एबीपी माझा या वृत्त वाहिनी सोबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘भाजप हा पक्ष आरएसएसपासून प्रेरणा घेऊन काम करतं. आमच्या अजेंडयामध्ये वैचारिक गोष्टी आहेत, तशाच कार्यपद्धती हा देखील आमच्या अजेंड्याचा भाग आहे. घरातली वाद, भांडणे बाहेर जाऊ न देणे, दुसऱ्याला मोठे करणे हा आमचा अजेंडा आहे.’ संघ आणि पक्षाचे अजेंडे सांगतानाच ‘मात्र खडसे वेळोवेळी त्यांचे मुद्दे बाहेर मांडत आले’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ खडसे यांना वारंवार संधी देण्यात आली आहे असे सांगताना ते म्हणाले की, खडसे यांना आतापर्यंत 7 ते 8 वेळा संधी देण्यात आली आहे. त्यांचा मुलगा, सून आणि मुलीला संधी देण्यात आली. असे असूनही त्यांच्या नावाचा एखादेवेळी विचार न केल्यास ते बाहेर येऊन बोलतात, हे केंद्रीय पातळीवर लक्षात घेण्यात असेल कदाचित यामुळे ही त्यांच्या नावाला नाकारण्यात आले असेल असेही पाटील म्हणाले. खडसे यांना तिकिट द्यायला हवे होते अशीच माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती, परंतु केंद्रानं तिकीट नाकारले असल्याचे पाटील म्हणाले. परंतु खडसे आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळींना मिळालेली संधी लक्षात घेता त्यांच्यावर अन्याय झाला असे केंद्रीय नेत्यांना वाटत नसेल, असेही त्यांनी सांगितले.



























































