
कोरोनावर उपचारासाठी जगभरातील शास्त्रज्ञ औषध शोधत आहेत. पण हिंदुस्थानातील प्राचीन आयुर्वेद शास्त्रांमध्ये कोरोनासारख्या तीव्र श्वसन विकारांवर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. हीच औषधे आता कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी वापरली जाणार आहेत. चार आयुर्वेदिक औषधांचे कॉम्बिनेशन कोरोनाला मारू शकते. केंद्रीय ‘आयुष’ मंत्रालय लवकरच त्या औषधांची चाचणी सुरू करणार आहे. केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. आयुष मंत्रालय आणि काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रीसर्च (CSIR) संयुक्तरीत्या चार आयुर्वेदिक औषधांच्या कॉम्बिनेशनची चाचणी आठवडाभरात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अश्वगंधा, गुडुची, पिंपळी, ज्येष्ठमध ही आयुर्वेदिक औषधे या चाचणीमध्ये वापरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे मलेरियावर उपचारासाठी बनवण्यात आलेल्या ‘आयुष्य-64’ या आयुर्वेदिक गोळ्यांचाही वापर होणार आहे, अशी माहिती केंद्रीय कोविड टास्क फोर्सकडून देण्यात आली आहे. या चाचण्या होणार असून महाराष्ट्रातील मुंबई पुणे आणि नागपूर मधील रुग्णालय यांचाही त्यात समावेश आहे.
गुजरातमध्ये शेकडो पॉझिटिव्ह रुग्ण झाले निगेटिव्ह
आयुर्वेदिक उपचार घेतलेले गुजरातमधील शेकडो कोरोना पॉझिटिव रुग्णांचे अहवाल काही दिवसातच निगेटिव्ह आल्याचे दिसून आले होते अशी माहिती डॉक्टर परिक्षित शेवडे (एमडी, आयुर्वेद) यांनी दिली. गुजरातमध्ये सुरुवातीला 6 हजार 878 रुग्णांना आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधे दिली गेली होती. त्यातील 5102 जणांना आयुर्वेदीक तर 1688 जणांना होमिओपॅथिक औषधे दिली गेली. त्यातील केवळ 13 रुग्ण हे पॉझिटिव्ह आणि इतर सर्व निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी औषधांचा कोर्स फक्त तीनच दिवस केला होता. या एकूण रुग्णांपैकी कोणाचीही प्रकृती चिंताजनक बनली नाही किंवा कोणीही दगावले गेले नाही असे डॉक्टर शेवडे यांनी सांगितले. अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या 213 रुग्णांना सात दिवसांचा आयुर्वेदिक औषधांचा कोर्स दिला होता. त्यातील 203 रुग्णांचे अहवाल सात दिवसानंतर निगेटिव्ह आले होते. गुजराच्या आरोग्य सचिव डॉक्टर जयंती रवी यांनी ही माहिती जाहीर पत्रकार परिषदेत दिली होती असे डॉक्टर शेवडे यांनी सांगितले. दिल्लीमध्ये डॉक्टर विदुला गुजरवार यांच्या अखत्यारित दाखल असलेल्या 105 रुग्णांवरही आयुर्वेदिक उपचार केले जात आहे. करोलबाग येथे युनानी तिपिया अँड आयुर्वेद कॉलेज येथे रुग्णांवर उपचार, अभ्यास केला जात असल्याची माहिती डॉक्टर शेवडे यांनी दिली























































