
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजुरांसाठी ट्रेन आणि बसची सोय करण्यात येत आहे. त्यामधून परराज्यातील मजूर आपल्या गावी परतत आहेत. मात्र, सूरत ते उत्तराखंड असा प्रवास केलेल्या ट्रेनमधून 167 प्रवासी गायब असल्याचे वृत्त आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सूरतहून निघालेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये तब्बल 1340 प्रवासी मजूर होते. मात्र, हरिद्वार येथे पोहचेपर्यंत या ट्रेनमधून तब्बल 167 मजूर गायब असल्याचं निदर्शनाला आलं आहे. या मजुरांची तपासणी करून मगच त्यांना क्वारंटाईन करण्यात येत असल्यामुळे या विशेष ट्रेनच्या पहिल्या आणि शेवटच्या स्थानकांच्या प्रभारींकडे या मजुरांची यादी देण्यात आली होती. हरिद्वार येथे पोहोचेस्तोवर यातील दोन्ही यादींमध्ये फरक आढळला. त्यामुळे हे प्रवासी नेमके कुठे गायब झाले, याचा शोध प्रशासन घेत आहे.
ही ट्रेन आतापर्यंत पुणे, सूरत, बेंगळुरू इथले प्रवासी घेऊन हरिद्वार येथे दाखल झाली आहे. हे प्रवासी मजूर यादीत नाव असल्यानुसार ट्रेनमध्ये चढले होते किंवा नाही, याचा शोध घेण्यात येत आहे. ट्रेनमध्ये चढल्यानंतर जर हे प्रवासी गायब असतील, तर हा विषय गंभीर असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी ग्वाहीही देण्यात आली आहे.



























































