‘मिशन धारावी’त योगोपचारावर भर; कोरोना रुग्णांना प्राणायाम, योगासनांचे धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावीतील कोरोना रुग्ण आता औषधोपराबरोबरच योगाचे धडेही गिरवत आहेत. आयसोलेशन वॉर्डमध्ये योग्य आहार, उपचार सुरू असतानाच आता शारीरिक-मानसिक संतुलन राखण्यासाठी योगासनांची जोड दिली जात आहे. कोरोना रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवून त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी पालिकेची मिशन धारावी मोहीम अधिक जोमाने काम करत आहे.

मुंबईतील अत्यंत दाटीवाटीचे ठिकाण असलेल्या धारावीत कोरोनाचे आतापर्यंत 1154 रुग्ण सापडले असून 53 जणांचा मृत्यू झाला आहे तर 300 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर सुमारे 37 हजार रहिवासी क्वॉरेन्टाईन सेंटरमध्ये आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने मिशन धारावी हाती घेतले असून त्या माध्यमातून पॉझिटिव्ह रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ज्या रुग्णांना कोणताही दीर्घकालीन आजार नसतो आणि रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असूनही ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे नसतात असे रुग्ण अधिक जलद गतीने बरे होताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, धारावीत कोरोना सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्राणायाम आणि योगासने शिकवली जात आहेत. धारावीत राजीव गांधी क्रीडा संकुलात कोरोना सेंटर -2 मध्ये डॉ. धनंजय मोरे यांनी शनिवारी रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्राणायाम आणि योगासनाचे धडे दिले. धारावीत दररोज वेगवेगळ्या कोरोना सेंटरमध्ये रुग्णांना अर्धा तास प्राणायाम आणि योगासने डॉ. मोरे शिकवणार आहेत. जी/उत्तरचे पालिका अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाला रोखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.

  • कोरोनाचा विषाणू रुग्णाच्या फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे हे महत्त्वाचे लक्षण आढळते. योगासन आणि प्राणायामाच्या माध्यमातून दुबळी झालेल्या फुफ्फुसांना सक्षम बनवले जाते. अनेक योगासनांबरोबर अनुलोम-विलोम, सुर्यभेदन, भ्रसरिका, कपालभाती या प्राणायामामुळे फुफ्फुसे कार्यक्षम आणि मजबूत बनतात.

‘कोरोनामुळे सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे. अशा वेळी कोरोना रुग्णांमधील शारीरिक-मानसिक संतुलन वाढवून, त्यांच्यातील सकारात्मकता वाढवणे आवश्यक होते. प्राणायाम आणि योगामुळे रुग्णांची रोगप्रतिकार शक्तीही वाढणार आहे. त्यामुळे धारावीतील सर्व कोरोना सेंटरमधील रुग्णांना प्राणायाम-योगाचे धडे दिले जाणार आहेत.’
– किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, जी/उत्तर

दादरमध्ये 86 वर्षांची आजी कोरोनामुक्त
पालिकेच्या जी/दक्षिण भागात येणाऱ्या दादर, माहीम आणि धारावीत कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही बऱ्यापैकी आहे. दादरमधील डिसिल्व्हा हायस्कूलमधील कोरोना सेंटरमधून शुक्रवारी 86 वर्षांच्या आजी कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या. प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर आजी कोरोनामुक्त झाली. दादरमधून आतापर्यंत 47, माहीममधून 53 तर धारावीतून 293 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.