
वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या अवेळी पावसाचा आंबवली भिंगारा धनगरवाडीला चांगलाच तडाखा बसला. डोंगरावर वसलेल्या या वाडीत काही घरांचे आणि गोठयांचे नुकसान झाले. वादळामुळे एका शेतकऱ्याचा गोठा जमीनदोस्त झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले या दुर्घटनेत गोठ्यात बांधलेल्या सात जनावरांपैकी 5 जनावरेही जखमी झाली आहेत.
कोरोनाच्या दहशतीमळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली असतानाच आता आस्मानी संकटाचाही सामना करावा लागतो आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह वारंवार अवेळी पाऊस कोसळू लागल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. परवा झालेल्या चक्रीवादळाचा मोठा तडाका आंबवली भिगारा यथील धनगरवाडीला बसला. या वादळात धाकू पांडूरंग गोरे यांचा गोठा जमीनदोस्त झाल्याने सुमारे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले. ही दुर्घटना घडली तेव्हा गोठ्यात सात जनावरे वांधलेली होती. यातील पाच जणावरे या दर्घटनेत जखमी झाली आहेत.
चक्रीवादळामुळे परिसरातील आणखी काही गोठे आणि घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा महसुल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. पाऊस तोंडावर आला असताना गोरे यांचा गोठा जमीनदोस्त झाला असल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. या संकटातून पुन्हा उभे राहण्यासाठी त्यांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी होत आहे.























































