
हिंदुस्थानचा शेजारी नेपाळने देशाचा नवीन नकाशा जारी केला असून हिंदुस्थानच्या काही भूभागावर आपला दावा ठोकला आहे. नेपाळने नवीन नकाशात लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा असा जवळपास 395 चौरस किलोमीटरच्या भागावर दावा केला आहे. नेपाळचे मंत्री पद्मा अरयाल यांनी हा नवीन नकाशा प्रसिद्ध केला आहे. नेपाळच्या या रणनीतीमागे चीनचा हात असल्याचा दाट संशय असून यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत नेपाळने नव्या नकाशाला मंजुरी दिली. या नव्या नकाशानुसार, लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरा भाग नेपाळमध्ये दाखवण्यात आले आहेत. हे भाग हिंदुस्थानच्या हद्दीतील आहेत. नेपाळच्या या नकाशावर हिंदुस्थानने अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.
लिपुलेख या भागात हिंदुस्थान, नेपाळ आणि चीनची सीमा एकत्र येते. त्यामुळे या भागाला विशेष महत्त्व आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या नव्या नकाशामध्ये 7 प्रांत, 77 जिल्हे आणि लिपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानीसह 753 स्थानिक प्रशासन मंडळही दाखवण्यात येणार असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञावली यांनी दिली.

काय आहे सीमा वाद?
नोव्हेंबर 2019 मध्ये हिंदुस्थानच्या गृहमंत्रालयाने नकाशा जारी केला होता. ज्यात कालापानीचा समावेश होता. यामुळे नेपाळ सरकार नाराज झाले. तसेच कालापानीच नाही तर लिपुलेख हा भागही आमचा आहे, असा दावा नेपाळने केला. काही दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कैलास मानसरोवरला जाण्यासाठी 80 किलोमीटरच्या रस्त्याचे उद्घाटन केले होते. हा रस्ता लिपुलेख भागात संपतो. यावरूनही नेपाळने आक्षेप घेतला होता. नेपाळला चीनची फुस असल्याचे दिसते.
दरम्यान, या वादात अभिनेत्री मनीषा कोईराला हिने उडी घेतली असून तिने नेपाळच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.



























































