संभाजीनगरात कोरोनाचे आणखी 3 बळी; मृतांची संख्या 39 वर पोहोचली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर शहरात आज पहाटे कोरोनामुळे आणखी 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबरच शहरातील कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या आता 39 वर पोहोचल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

आज पहिला मृत्यू इंदिरा नगर बायजीपुरा येथील 80 वर्षीय पॉझिटिव्ह पुरुष रुग्णाचा झाला. या रुग्णास 14 मे रोजी सकाळी 11 च्या सुमारास घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण केवळ 60 टक्के होते. भरती होतात त्याचा स्वब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला. त्याचा अहवाल  पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू करण्यात आले. न्यूमोनिया आणि शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी यामुळे हा रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे आज 20 मे रोजी सकाळी 6 वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दुसरा मृत्यु जयभीमनगर घाटी येथील 55 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुष रुग्णाचा झाला. या रुग्णास 19 मे रोजी पहाटे दमा आणि शौचाच्या त्रासामुळे भरती करण्यात आले. त्या वेळी त्याच्या शरीरातील ऑक्सिजन 87 टक्के इतका होता. त्याच्यावर कोविडचे उपचार सुरू करण्यात आले आणि लाळेचा नमुना  घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. या रुग्णाची 5 वर्षांपूर्वी बायपास सर्जरी झालेली होती. तसेच त्याला न्यूमोनिया झाल्याने हा रुग्ण उपचारात प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे  या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रात्री 11.30 वाजता त्याच्या लाळेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

तिसरा मृत्यू राहेमानिया कॉलनीतील 50 वर्षीय महिलेचा झाला आहे. या महिलेस 19 मे रोजी दाखल करण्यात आले होते. या महिलेस न्यूमोनिया आणि कोरोनाचा संसर्ग असल्याने ती उपचारास प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे आज पहाटे त्यांचा मृत्यू  झाला. या 3 रुग्णाच्या मृत्यू बरोबरच शहरातील कोरोनाच्या बळींची संख्या आता 39 वर पोहोचली आहे