
परभणी जिल्ह्यात पूर्णा येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेला व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने पूर्णा शहरात संचारबदी लागू करण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 कलम 144 नुसार पूर्णा हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर पूर्णा नगर परीषद हद्दीत आणि जवळच्या 3 कि.मी. परिसरामध्ये शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी जारी केले आहेत.
संचारबंदीतून सर्व शासकीय कार्यालये त्यांचे कर्मचारी व त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने व वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेली वाहने व व्यक्ती, वैद्यकीय व त्यासंबंधी सेवा, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे संपादक व वार्ताहर तसेच प्रतिनिधी आणि वितरक, पेट्रोलपंप वितरक व कर्मचारी आणि त्यांची वाहने, दुध विक्रेते, खत वाहतूक त्यांचे गोदामे व दुकाने आणि त्यांच्यासाठी लागणारी वाहने व कामगार, राष्ट्रीयकृत बँका आदी व्यक्ती व समूहाला सुट राहील.
संचारबंदीतून सूट दिलेल्या बाबींशिवाय संचारबंदी लागू केलेल्या भागात इतर कोणतीही व्यक्ती व वाहने रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधीक्षक, उपविभागीय दंडाधिकारी, अन्न व प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त, तालुका दंडाधिकारी पूर्णा व मुख्याधिकारी नगर परीषद पूर्णा यांच्यावर राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.



























































