‘मातोश्री’वर खलबते; शरद पवार, उद्धव ठाकरे दीड तास चर्चा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar-uddhav-thackeray

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे सोमवारी सायंकाळी अचानक मातोश्री निवासस्थानी दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली. बंद दाराआड नेमकी काय खलबते झाली याचा नेमका तपशील मात्र समजू शकलेला नाही. या बैठकीला शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते.

शरद पवार यांची ‘मातोश्री’ भेट पूर्वनियोजित नव्हती. सायंकाळी ते अनपेक्षितपणे ‘मातोश्री’वर पोहोचले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर ही गुप्त बैठक झाली. बैठकीत कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात उद्भवलेल्या प्रश्नांवर चर्चा झालीच याशिवाय राजकीय परिस्थितीचा उहापोह करण्यात आला. पवारांच्या ‘मातोश्री’ भेटीमुळे गेले काही दिवस प्रसार माध्यमांमध्ये सुरू असलेल्या पतंगबाजीला पूर्ण विराम मिळाला आहे. शरद पवार हे सरकारच्या कामावर नाराज आहेत, अशा बातम्या काही माध्यमांनी दिल्या. त्यातच त्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांनी मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करत या साऱ्या ‘बातम्या’ अफवा ठरवल्या आहेत.