
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोना महामारीविरोधात डॉक्टर, पोलीस रात्रीचा दिवस करून लढत आहेत. या कोविड योध्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कल्याणमध्ये शिवसेनेच्या पुढाकाराने 150 पोलिसांना पीपीई किट वाटप करण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका सर्व आघाडीवर काम करत आहे. सरकारी दवाखान्यात मोफत उपचार केले जात आहेत. शिवसेनेच्या पुढाकारामुळे सर्व प्रभागात स्वच्छता, जंतुनाशक फवारणी केली जात असून घरोघरी आरोग्य कर्मचारी वैद्यकीय तपासणी करत आहेत. याशिवाय दोन महिन्यांपासून दररोज दोनशेहून अधिक गरजूना दोन वेळचे मोफत जेवण पुरवले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे कल्याणमध्ये राहत असून मुंबईत कर्तव्य बाजावणाऱ्या पोलिसांच्या कामाची शिवसेनेने दखल घेतली. नगरसेवक प्रभुनाथ भोईर यांनी 150 पोलीस बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पीपीई किट वाटप केले. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले. शिवाय सर्वांना धान्यही घरपोच करण्यात आले. यावेळी नगरसेवक जयवंत भोईर, रावसाहेब आहेर, राजकुमार जाधव, वैभव भोईर, वंडार कारभारी, जितेश भंडारी आदी उपस्थित होते.































































