
रेशनकार्ड नसलेला मजूर, कामगारदेखील उपाशी पोटी झोपू नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा पुरवठा विभागाने “ईझीफॉर्म” हे मोबाईल अप्लिकेशन तयार केले असून त्याद्वारे रेशन दुकानातून धान्य वितरित केले जात आहे. विशेष म्हणजे हे अप्लिकेशन राज्यातील अन्य 18 जिल्ह्यातही कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे रायगड पोलिसांनी तयार केलेल्या ई-पास प्रणालीप्रमाणे जिल्हा पुरवठा विभागाचे हे अप्लिकेशनही राज्यासाठी मॉडेल ठरले आहे. त्याशिवाय गरजूंना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या काळात कामधंदा बंद झाला असला तरी कोणीही उपाशी राहणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे. रेशनकार्डधारकांना जसे स्वस्त आणि मोफत धान्य वितरीत करीत आहेत. मात्र, कोरोनाच्या संकटाच्या काळात ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा मजूर, कामगार नागरिकांची काळजीही शासनाने घेतली असून रेशन दुकानातून प्रत्येकी पाच किलो तांदूळ देण्याची योजना लागू केली आहे.
अशी झाली सुरवात
रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना धान्य देण्याबाबत शिवभोजन अॅप अथवा नवीन अप्लिकेशन तयार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार रायगड जिल्हा पुरवठा विभागाने पहिले पाऊल उचलले असून ‘इझीफॉर्म’ हे मोबाईल अप्लिकेशन बनविले आहे. पुणे येथील अभिनव आयटी सोल्युशेनमार्फत हे अप्लिकेशन तयार केले आहे. या अप्लिकेशनमध्ये लाभार्थी व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड व इतर माहिती भरून घेतली जात आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर त्वरित लाभार्थी व्यक्तीला धान्य दिले जात आहे. इझीफॉर्म हे अप्लिकेशन तयार केल्यानंतर ते शासनाला दखवण्यात आले. त्याला शासनाने मंजुरी दिली असून इतर जिल्ह्यातही हे अप्लिकेशन वापरण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
- इझिफॉर्म हे अप्लिकेशन जिल्ह्यातील सर्व रेशनिग दुकानदारांना दिले आहे. जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार मजूर,कामगार व्यक्तींना याचा लाभ मिळणार असून 22 मेपासून या अॅपद्वारे 552 नागरिकांनी लाभ घेतला आहे.
- जिल्ह्यात रेशनकार्ड नसलेल्यांसाठी 926 मॅट्रिक टन धान्य आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी दिली.























































