‘निसर्ग’ कोपणार? मुंबईसह पाच जिल्ह्यात चक्रीवादळाचे ‘हाय अलर्ट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावासोबतच महाराष्ट्रासमोर नवे संकट उभे राहिले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याची तीव्रता वाढून याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे ‘निसर्ग’ चक्रीवादळ बुधवारी ( 3 जून ) राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रातासोबतच गुजरातलाही या चक्रीवादळाचा मोठा धोका आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मयुरेश प्रभुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळाचे डीप डिप्रेशन झाले आहे. पुढील 12 तासात त्याचे चक्रीवादळाचा रूपांतर होऊ शकते. तसेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग आणि मुंबईच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ येताना दिसत आहे. पुढे डोंबिवली मार्गे धुळ्याच्या दिशेने हे चक्रीवादळ जाऊ शकते. धडकण्याची 24 तास आधी हे चक्रीवादळ नेमकं कुठे कधी कसे धडकणार आहे, याची नेमकी माहिती देता येऊ शकते. ताज्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 5.30 वाजता ते सायंकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान हे चक्रीवादळ अलिबाग येथील नागाव समुद्र किनाऱ्याला धडकताना दिसत आहे. चक्रीवादळ खूप मोठं असतं. याचा फटका अशा एका लहान क्षेत्राला बसत नसून दोनशे ते दीडशे किलोमीटर पर्यंत बसू शकतो. हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीजवळून उत्तरेकडे सरकत आहे. यामुळे बराच मोठा भाग कव्हर होऊ शकतो. ज्यात नवी मुंबई, मुंबई, डोंबिवली आणि उपनगरांचा भाग दिसत आहे, अशी माहिती मयुरेश प्रभुणे यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणले की, या चक्रीवादळचा धोका असताना फक्त किनारपट्टीवर लक्ष ठेवून चालणार नाही. कारण याची तीव्रता जास्त असल्याने किनारपट्टीवरून आतील भागात हे प्रवेश करेल आणि त्याचे चक्रीवादळासारखे स्वरूप असले. त्यामुळे आतल्या भागाला ही काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांना सतर्क करणे आवश्यक आहे. दरम्यान, मुंबई, पालघर, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलर्ट जरी करण्यात आले आहे.