मेगा लॉटरीतील भाग्यवंतांना सिडकोचा दिलासा; घराच्या थकलेल्या हप्त्यांचे विलंब शुल्क माफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या जागतिक संकटाचा सामना करताना सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ मिळावे, यासाठी सिडकोने घराच्या थकलेल्या हप्त्यांवरील विलंब शुल्क माफ केले आहे. त्यामुळे सिडकोच्या मेगालॉटरीतील हजारो भाग्यवंतांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक लॉटरी विजेत्यांना सिडकोचे दोन हप्ते वेळेत भरता आले नाहीत. बँकांमध्ये अपुरा कर्मचारी असल्यामुळेही हप्ते वेळेत भरले गेले नाहीत. त्यामुळे रखडलेल्या हप्त्यांवर विलंब शुल्क आकारल्याचे दाखवले गेले. मात्र, हे विलंब शुल्क सिडकोने माफ केले आहे. 24 एप्रिलपासून ते 31 मेपर्यंत या कालावधीतील विलंब शुल्क घर मालकांना भरावे लागणार नाही. यासाठी घराचा हप्ता मात्र येत्या 30 जूनच्या आत भरावा लागणार आहे. विलंब शुल्क माफीचा निर्णय सिडकोने सामाजिक बांधिलकीमधून घेतला आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

हप्ते रखडल्यानंतर विलंब शुल्काची रक्कम सिडकोच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये दाखवण्यात आली. त्यामुळे हजारो घर मालकांनी ही रक्कम भरली. मात्र, त्यांची ही रक्कम अन्य देयकांमध्ये वळती करण्यात येणार आहे, असे सिडकोच्या वतीने सांगण्यात आले आहे.