सलून चालक अडकले अडचणींच्या कात्रीत!! येत्या दहा जूनला काळ्या फिती लावून करणार आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे लॉकडाऊन हळूहळू उठवला जात आहे. मात्र मुंबईच्या उपनगरातील सलून आणि ब्युटी पार्लर चालकांना अद्याप सरकारकडून दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. आधीच लॉकडाऊनमुळे त्रस्त मुंबईतील सलून चालक आता पुन्हा एकदा कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आपल्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, या मागणीसाठी मुंबईसह उपनगरातील सलून आणि ब्युटी पार्लर चालकांनी येत्या 10 जून रोजी काळ्या फिती लावून आंदोलनाचा इशारा दिला आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई सलून ब्युटी पार्लर असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यामुळे अनेक क्षेत्रांना त्याचा फटका बसला. मुंबईच्या उपनगरातील सलून आणि ब्युटी पार्लर चालकांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने भाव वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच बरोबर अनेक नियमांची घोषणा करत दुकाने सुरू करण्यास राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. त्यामुळे सर्वांनी लॉक ओपन होताना दुकाने सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही दुकाने सुरू करण्यास परवानगी न मिळाल्याने सलून चालक आणि कारागिरांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे पत्र व्यवहार देखील केला असताना अद्याप दुकाने सुरू करण्यास परवानगी न दिल्याने मुंबई चालून आणि ब्युटी पार्लर असोसिएशन आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने येत्या 10 जून रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे सचिव प्रकाश चव्हाण यांनी दिली.

या आंदोलनाबाबत प्रकाश चव्हाण म्हणाले की, आम्ही सरकार सोबतच आहोत. कोणत्याही नियमांचे उल्लंघन आम्हाला करायचे नाही. आज दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी कोणताही निर्णय झालेला नाही. आमच्या समोर आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळेच आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. येत्या दहा जूनला मुंबईतील प्रत्येक सलून चालक आणि कारागीर आपल्या दुकानासमोर हे आंदोलन करणार आहे. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळूनच हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सामाजिक सुरक्षा मंडळाच्या योजना कधी
गेल्या दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारतर्फे सामाजिक सुरक्षा मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून असंघटित कामगारांना मदत केली जाणार होती. याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे सरकारने याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी मुंबई सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.