आपत्कालिन परिस्थितीत परीक्षेपेक्षा शिक्षण सुरु राहिले पाहिजे – मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच तंत्रज्ञानाच्या कोणत्याही आपत्कालिन परिस्थितीमध्ये शिक्षण कसे सुरु राहील यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करुन परीक्षा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसे सुरु राहील याकडे सर्वानी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर आनंद मिळतोच पण ते शिक्षण घेताना अधिक आनंदी राहून ते कसे यशस्वी होतील याकडे महाविद्यालयांनी लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एचएसएनसी समुह विद्यापीठाच्या उद्‌घाटन प्रसंगी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षण हे जीवनावश्यक असल्याने चौकटबद्ध शिक्षणापेक्षा आनंदाने जगण्याची कला शिकविणारे शिक्षण असले पाहिजे. या समुह विद्यापीठामुळे शैक्ष्‍ाणिक दर्जा उंचावण्याबरोबरच नव नवीन अभ्यासक्रमाचे स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा कला, संगीत, आरोग्य, कृषी, क्रीडा आशा विविघ विषयात कोणत्याही वयात शिक्षण घेता येईल आणि विद्यार्थी आपली कला जोपासतील. मी सुद्धा कला शाखेचा विद्यार्थी आहे. मी मुख्यमंत्री झालो नसतो तर चांगला कलाकार झालो असतो. असे सांगुन मला अजूनही शिक्षण घेण्यास आवडेल, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

शि‍क्षित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे देशाचे भवितव्य घडविणारे शिल्पकार आपण तयार करत आहात. जागतीकीकरणामध्ये शिक्षण क्षेत्रात बदल होत आहेत. मात्र शिक्षणाची भूक मात्र तीच कायम आहे. त्यासाठी दर्जेदार गुणवत्तापूर्ण सहज सोपे विद्यार्थ्यांना आनंद देणारे शिक्षण दिले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. याचा फायदा आपत्कालिन परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना होत आहे. या विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही वयात शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येतील. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एचएसएनसी समुह विद्यापीठाच्या वेबसाईटचे ऑनलाईन उद्‌घाटन करण्यात आले.