
>> प्रभाकर कुलकर्णी
सध्याच्या कोरोना संकट काळात लोकांना नियम पाळण्यासाठी, विशिष्ट अंतर ठेवून सर्व व्यवहार करण्यासाठी ‘कायदा व सुव्यवस्था’ कार्यवाहीत येत आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी घेतलेल्या खबरदारीच्या उपायांचे काटेकोरपणे पालन करण्यास महत्त्व दिले आहे. पूर्वीच्या सामान्य काळात ‘कायदा व सुव्यवस्था’ ही संकल्पना शासकीय कार्यालयांमध्ये घेराव घालण्यार्या निदर्शकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जात असते.
जिल्हाधिकारी कार्यालयांना ‘बॅरिकेड्स’ ने बंदिस्त करून पोलीस नियंत्रण करतात आणि काही थोडे प्रतिनिधी यांनी कार्यालयात जावे व चर्चा करावी अशी व्यवस्था करतात. ही अर्थातच ‘ब्रिटिश शैली’ आहे. कारण ‘कायदा आणि सुव्यवस्था’ अशा आकर्षक नावाखाली ब्रिटिशांनी त्यांच्या आज्ञेत राहण्यासाठी व हिंदुस्थानी लोकांना दडपण्यासाठी किंवा शिस्त लावण्यासाठी याचा वापर केला.
आता आपल्या लोकशाहीमध्ये आपण निवडलेले आमदार आणि खासदार विधानसभा आणि संसदेत कायदे करतात आणि हे कायदे लोक व ज्यांच्यासाठी कायदे केले जातात त्यांनी पालन करणे अपेक्षित आहे. सर्व कायद्यांचे संबंधित संस्थांकडून पालन केले जात असल्याचे पाहणे हे देशातील प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित आहे. परंतु या वैधानिक अपेक्षेला जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलिस अधीक्षक प्रतिसाद देतात काय? उत्तर अर्थातच ‘नाही’. हे विशेषत: माहितीचा अधिकार कायद्याच्या तरतुदींचे पालन होते काय याविषयासंबंधित आहे. माहिती अधिकार कायद्याच्या कलम 4 मध्ये प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाला कायद्याच्या अंमलबजावणीपासून एकशे वीस दिवसांत आपली सर्व माहिती प्रकाशित अगर कार्यालयातील दर्शनी भागात फलक लावून लोकांना माहीत करण्याचे आदेश कायद्याने दिले आहेत. सार्वजनिक अगर शासकीय संस्थांचे कार्य आणि कर्तव्ये आणि उत्तरदायित्वाच्या जबाबदारींसह निर्णय करण्यात वापरलेली प्रक्रिया जाहीर करावयाची आहे. यामध्ये सर्व सरकारी, सहकारी, खासगी बँका, निमसरकारी संस्था, सरकारच्या सहाय्याने कार्य करीत असलेल्या सहकारी संस्था, नाबार्डसारख्या संस्था, सरकार नियंत्रित म्हाडासारखी महामंडळे, वीज वितरण संस्था अशा सर्वांचा समावेश आहे. मात्र गेल्या एक तपानंतरही कोणत्याही कार्यालयाने या वैधानिक कर्तव्याचे पालन केलेले नाही.
आता आजच्या संकट काळात सर्व बँकांवर व सर्व बँक शाखांवर ही कायदेशीर जबाबदारी आहे. कारण ज्या विशेष सुविधा राज्य आणि केद्र सरकारने आणि रिझव्र्ह बँकेने जाहीर केल्या आहेत त्यांची सत्वर कार्यवाही होण्यासाठी सर्व बँकांनी व शाखांनी आपल्या ठेवी व कर्जे, त्यांचे प्रमाण, किती कर्जे व ठेवींच्या किमान 70 टक्के या प्रमाणात कर्जे देय आहेत व या काळात कोणत्या पद्धतीने ग्राहकांना, लहान-मोठ्या उद्योजकांना, शेतकर्याना कर्जे व सर्व सवलतींचा लाभ घेता येईल ही सर्व माहिती लिखित स्वरूपात फलकावर लावली पाहिजे. ग्राहकांशी चर्चा करून माहिती देतो ही सध्याची कार्यशैली चालू ठेवता येणार नाही. कारण यात फसवणूक होते याचा बर्याच ग्राहकांना अनुभव आला आहे. चर्चा करून वेळ मारून न्यावयाची व कोणतेही रेकॉर्ड ठेवावयाचे नाही ही आजची पद्धत आहे व ती फसवी आहे. माहिती अधिकारांतर्गत माहिती देणे हे कायदेशीर बंधन आहे. ते आतापर्यंत अनेकदा पाळले गेलेले नाही व यापुढेही टाळता येणार नाही. कोरोना संकट काळात एका अर्थाने या कायद्याचे पालन करण्याची इष्टापत्तीच आली आहे. राज्यातील व देशातील सर्वच जिल्हा प्रशासनाने ही कार्यवाही करावयाची आहे. जिल्हा प्रशासन व संबंधित अधिकारी याबाबतीत अजूनही उदासीन राहत असतील तर सर्व ग्राहक, लोकप्रतिनिधी, सर्व सामाजिक संस्था आणि जागरूक राजकीय कार्यकर्ते यांनी आवाज उठवून कार्यवाही करण्यास भाग पाडले पाहिजे. कारण कायदा पाळणे हीच खरी ‘कायदा व सुव्यवस्था’ राखण्याची कसोटी आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व अर्थ विषयांचे विश्लेषक)























































