
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहालगत तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातुन दोन कैद्यांनी पलायन केले आहे. शनिवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास या कारागृहातील दोन कैदी पळून गेले आहेत.
हर्षद सय्यद (वय 20, रा.कासारवाडी) आणि आकाश बाबुराव पवार (वय 26 रा.काळेवाडी) अशी पळालेल्या कैद्यांची नावे आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कैद्यांवर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याची नोंद आहे. आकाश पवार या कैद्याने याआधीही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पवारसोबत आणखी दोन आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा कट रचला होता. वैद्यकीय तपासणीसाठी नेल्यावर त्यांनी गोंधळ घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.




























































