
सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना शनिवारी कोरोनाचा आठवा बळी गेला. वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी येथील 50 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याशिवाय नव्याने तब्बल 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शिराळा तालुक्यातील नऊ जणांचा समावेश असून हॉटस्पॉट असलेल्या मणदूरमधील पाच जण आहेत. शिराळ्यातील पुनवत, पणुंब्रे, खेड, माळेवाडी येथे प्रत्येकी एक तर बुधगाव मधील दोन महिला, खानापूर तालुक्यातील भाळवणी, भिकवडी खुर्द, वांगी व पलूस येथील प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्व रुग्णांवर मिरजेतील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.
दरम्यान जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 222 वर गेली असून सध्यस्थितीत 97 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
जिल्ह्यात मागील वीस दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिकच वाढत चालली आहे. मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे शनिवारी नवे 16 रुग्ण आढळले. जिल्ह्यात कोरोनाचा आठवा बळी गेला. वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी येथील 50 वर्षाचा पुरुषामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती, त्याला अत्यवस्थ अवस्थेत मिरजेतील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. तेथे तात्काळ स्वॅब घेतला होता. परंतू मध्यरात्री त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीचा कोरोनाचा चाचणीचा अहवाल शनिवारी सायंकाळी आला असून तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.
शिराळा तालुक्यातील हॉटस्पॉट बनलेल्या मणदूर येथील पाच व्यक्तींचा समावेश आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळत असून तालुका हॉटस्पॉट बनला आहे. यामध्ये मणदूर गावात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचारानंतर शनिवारी सहा कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्यक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.























































