दोन सख्ख्या भावांच्या मृत्यू प्रकरणी जळकोटमध्ये महावितरणचे सहायक अभियंता व तंत्रज्ञ निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतात पाईप जमा करीत असताना न्यूट्रल तारेचा स्पर्श होऊन 11 जून रोजी इलेक्ट्रिक शॉक लागून हाळदवाढवणा (ता. जळकोट ) येथील दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दोन तरुणांच्या मृत्यूस जबाबदार धरुन महावितरणचे जळकोट येथील शाखा अभियंता व रावणकोळा (ता. जळकोट) येथील तंत्रज्ञ या दोघांना महावितरणच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

हाळदवाढवणा येथील परमेश्वर संजय दहिकमळे (26) व कपिल संजय दहिकमळे (22) हे दोघे सख्खे भाऊ आपल्या शेतातील पाईप जमा करीत असताना त्यांना वीजेचा धक्का लागून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सदर न्युट्रल तारा बऱ्याच ठिकाणी तुटल्यामुळे त्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करून घेण्याची जबाबदारी असतानाही आपल्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे सकृतदर्शनी आढळून आल्याने महावितरणचे जळकोट येथील सहाय्यक अभियंता शिवराज व्यंकटराव दहिफळे व रावणकोळाचे तंत्रज्ञ अमितकुमार माणिकराव आसरे यांना 12 जूनपासून निलंबित करण्यात येत असल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे.

महावितरणचे लातूर मंडळाचे अधीक्षक अभियंता तथा सक्षम अधिकारी रवींद्र नळगीरकर यांच्या स्वाक्षरीने या दोघांचे निलंबन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, वीज कनेक्शनचे अर्ज प्रलंबित ठेवणे, मुख्यालयी न राहणे, कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे, ग्राहकांशी उद्धट वागणे असा ठपकाही निलंबन आदेशात ठेवण्यात आला आहे. सहाय्यक अभियंता व तंत्रज्ञ यांनी कामात हयगय व निष्काळजी केल्याने या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूस कारणीभूत या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे हाळदवाढवणा तसेच तालुक्यातील नागरिकांनी केली होती. त्यावरुन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी महावितरणच्या सक्षम अधिकाऱ्यांना संबंधित दोषींविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

जळकोट तालुक्यातील नागरिकांचा तीव्र संताप, कारवाईची मागणी, राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश यावरुन सहाय्यक अभियंता व तंत्रज्ञ यांचेविरुद्ध निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. लातूरचे अधीक्षक अभियंता रवींद्र नळगीरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी या निलंबनास दुजोरा दिला. निलंबन काळात या दोघांना कार्यकारी अभियंता, महावितरण विभागीय कार्यालय निलंगा येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तुटलेल्या तारा संबंधितांनी वेळीच दुरुस्त केल्या असत्या तर निष्पाप दोन जीव वाचले असते अशी भावना या दुर्घटनेनंतर व्यक्त होताना दिसत आहे. महावितरणने अनागोंदी कारभार सुधारुन ग्राहकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे अशी मागणीही तालुक्यातून होत आहे.