हात न लावता वाजतेय मंदिरातली घंटा, इंजिनियरचा भन्नाट शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगविषयी जनजागृती करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना आता यापुढे काळजी घ्यावी लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि एकंदरच कोरोनामुळे आता जगण्याच्या नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागणार आहेत. त्या सोप्या व्हाव्यात म्हणून अनेक जण प्रयत्न करत आहेत. त्यातीलच एका व्यक्तिच्या भन्नाट आयडिया सध्या चर्चेचा विषय आहे.

मध्य प्रदेशमध्ये एका व्यक्तिने हात न लावता वाजवता येणारी घंटा बनवली आहे. या व्यक्तिचं नाव नाहरू खान असं असून त्यांना यूट्युबवरून व्हिडीओ बनवून नवनवीन वस्तू बनवण्याचा छंद आहे. या छंदाचा वापर करूनच त्यांनी हा भन्नाट शोध लावला आहे. लॉकडाऊनचा अनलॉक टप्पा सुरू झाल्यानंतर काही काळाने मंदिरेही सुरू झाली. मात्र, स्पर्श टाळण्यासाठी मंदिराच्या घंटा बांधून ठेवण्यात आल्या होत्या.

नाहरू खान यांनी मंदिरात स्पर्श न करता घंटा वाजवता येईल का, यावर संशोधन सुरू केलं आणि त्यांना कल्पना सुचली. त्यांनी घंटेला प्रॉक्सिमिटी सेन्सर बसवला. अशा प्रकारचा सेन्सर वस्तुच्या जवळपासच्या हालचाली टिपू शकतो. हा सेन्सर बसवलेल्या घंटेला स्पर्श करण्याची गरज नसते. घंटेजवळ हात नेला की हाताची हालचाल टिपून घंटा आपोआप वाजू लागते. त्यांनी अशाच प्रकारची एक घंटा मध्य प्रदेशातील पशुपतीनाथ इथे बसवली. त्यांच्या या शोधाचं सर्वत्र कौतुक होतं आहे.

या संशोधनावर खान म्हणतात की, मी मशिदीतून येणारी अजान ऐकू शकतो. त्यासाठी मला स्पर्श करण्याची गरज नसते. पण, आता अशा परिस्थितीत स्पर्श न करता घंटानादही ऐकू आला तर, असा विचार मी केला आणि घंटेला सेन्सर बसवण्याची कल्पना मला सुचली, असं खान यांनी सांगितलं आहे. खान यांचा हा पहिलाच शोध नसून त्यांनी यापूर्वी स्वयंचलित सॅनिटायझिंग मशीनही बनवली आहे.