तीन चोरट्यांकडील चोरीचा माल विकत घेणारे तिघे गजाआड; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत चोरी करणाऱ्या तीन आरोपींकडून चोरीचा माल विकत घेणाऱ्या तिघांना चंदनझिरा पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. या चोरट्यांकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या आरोपींकडून दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

राजुरी स्टीलमधील कंपनीत असलेल्या वर्कशॉप डिपार्टमेंटमधून 65 हजारांचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार राजुरी स्टीलचे मॅनेजर अभिजित खरात यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीतील साहित्य चंदनझिरा येथे राहणाऱ्या झिंगा गँगचा रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन झिंगे आणि त्याच्या इतर साथीदारांनी चोरला असल्याची माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांना मिळाली. कौठाळे यांनी तत्काळ पोलीस कर्मचारी यांना आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. आरोपी सचिन झिंगे याला सनराईज हॉटेल येथून शिताफिने ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कुबली दिली. तसेच यासाठी साथीदार मंगेश प्रकाश मुळे (रा. विठ्ठलनगर, चंदनझिरा) आणि विकास ज्ञानेश्वर भुंबर (रा. भाग्यनगर, जालना) यांनी मदत केल्याचे सांगितले.

हा चोरीचा माल शेख फिरोज शेख ईस्माईल (रा. साईनाथनगर), जहश अब्दुल कयुब शेख (रा. बागवाननगरी), जुबेरखन चांदखान पठाण (रा. एकता चौक चंदनझिरा) यांना विकल्याचे त्याने सांगितले. या मुद्देमालातील चोरलेला माल व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा 1 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, सहायक पोलीस उपनिरीक्षक घोडे, पोलीस कर्मचारी प्रभाकर वाघ, गोविंद पवार, लक्ष्मण शिंदे, अजय फोके, अनिल काळे यांनी केली आहे.