
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना करतो. घरातील स्त्रियांना मात्र भाजी, दुधाची पिशवी तसेच दैनंदिन जिन्नस आणण्यासाठी बाजारात जावे लागत आहे. अशा परिस्थितीत दररोज घरी येणारा जिन्नस, भाजी तसेच दुधाच्या पिशवीतून कोरेना संसर्ग होण्याची शक्यता गृहिणींना सतावत आहे. ही भीतीही अनाठायी नसून त्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
दुधाची पिशवी घरात आणली की तिचं सॅनिटायझेशन व्हायलाच हवं. म्हणून ही पिशवीच अर्धा तास सर्फच्या पाण्यात ठेवते. या पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्यातून काढते. त्यानंतर ती फ्रिजमध्ये ठेवते. विशेष म्हणजे या काळात मी पालेभाज्या खाणंच टाळलं आहे. मागील दीड महिना मी घरात पालेभाजी आणलेली नाही, अशी प्रतिक्रिया नेरूळच्या नीलम महांकाळ यांनी दिली आहे.
दूध पिशवीपासून कोरोना संसर्ग होणार नाही यासाठी पुरेपूर काळजी
मुळात दूध हे ७० ते ८० डिग्री तापमानाला उकळून, त्याचं पाश्चरायझेशन करूनच ते पिशवीमध्ये भरतं. यातील बहुतांश प्रक्रियाही संगणकीय आहे. यामध्ये मानवाचा हस्तक्षेप फारच कमी आहे. त्या माणसांनाही आम्ही सॅनिटाइझ करतच आहोत. त्याचप्रमाणे दूध पॅकिंग झाल्यानंतर पिशवीही यू व्ही लाइटमधून जाऊन त्याचं निर्जतुकीकरण केलं जात आहे. दुधाच्या गाड्या, टँकर हेही सॅनिटाइझ केलं जात आहे. त्यामुळे या पातळीवर कोरोना संसर्गाचा धोका नाही- रमेश पाटील,दर्जा नियंत्रण अधिकारी, महानंद
अवैध भाजी मार्केट बंद केले तर धोका नाही!
भायखळा भाजी मार्वेâटमध्ये आम्ही येणाऱ्या ग्राहकाला सॅनेटाइझ करूनच आत सोडत होतो. त्याचप्रमाणे ज्या ट्रकमधून बाहेरच्या बाहेर भाजी देता येऊ शकेल अशा ट्रकना बाजारात प्रवेशही दिला नाही. त्यामुळे भायखळा भाजी बाजारात कोरोना शिरला नाही. त्याचप्रमाणे एपीएमसी मार्वेâटमध्येही १८ पैकी १६ गेट जे बंद ठेवले आहेत तसे न करता ते गेट उघडायला हवेत. जेणेकरून खरेदी केल्यानंतर ग्राहक तत्काळ बाहेर जाऊ शकेल. त्याचप्रमाणे नागपाड्यासारख्या ठिकाणी जे अनधिकृत भाजीमार्वेâट सुरू झाले आहेत. तिथे कोणतेच नियम पाळले जात नाहीत त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. तरच भाजीला कोरोनासंसर्गाचा धोका पोहोचणार नाही- किरण झोडगे, भायखळा भाजी मंडई
भाजीवाल्याकडून सुट्टे पैसे घेत नाही!
कोरोना संसर्ग कोणत्याही परिस्थितीत टाळायचाच. बाजारात जाताना जेवढे पैशाची भाजी घ्यायची तेवढेच पैसे घेऊन जाते. जर कधी १००रुपये घेऊन भाजीवाल्याकडे गेली. तर तेवढ्या पैशाची भाजी घेऊनच तिथून निघते. त्याच्याकडून सुट्टे पैसे घेत नाही. घराच्या खिडकीत छान ऊन्ह येते त्यात ती भाजी ठेवते. दुधाची पिशवी तर साबणाने धुऊनच घेते. कोरोनापासून वाचण्यासाठी एवढी सर्व काळजी कोपरखैरणे येथील गृहिणी सोनल सक्सेना घेत आहेत.
बाजारासाठी पाकीटच वेगळे
सोशल डिस्टन्सिंग पाळायचे म्हटले तरी भाजीवाला आहे किंवा दुधवाल्याकडून सुट्टे पैसे जेव्हा घेतो तेव्हा तसेच भाजीला किंवा पिशवीला स्पर्श झालेलाच असतो. घरी आल्यानंतर भाजी मिठातून तसेच दूध पिशवीही धुतोच पण बाजारासाठी पाकिटच वेगळे ठेवले आहे. बाजारासाठी पाकिटातीलच पैसे घेऊन जाणार आणि सुट्टे पैसेही त्याच पाकिटात आणून ठेवणार. नाणी सॅनिटाइझ करतो त्याप्रमाणे पाकीटही, असे काळाचौकीच्या हर्षदा मिसाळ यांनी सांगितले.
























































