
अमेरिकेतील हॉकेंसिन शहरात 25 फुटांची हनुमानाची भव्य मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. या मूर्तीचे वजन तब्बल 30 हजार किलोग्रॅम आहे. ही मूर्ती हिंदुस्थानात तयार करण्यात आली असून जहाजाद्वारे अमेरिकेला नेण्यात आली आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी 1 लाख डॉलर इतका खर्च आला आहे.
अत्यंत सुबक आणि नक्षीदार असलेली ही मूर्ती हिंदुस्थानात दक्षिणेकडील कारंगळ या छोटय़ा शहरात काळय़ा रंगाच्या ग्रेनाईटच्या दगडापासून तयार करण्यात आली आहे. एकाच दगडात कोरून ही मूर्ती तयार केली असून त्यासाठी 12 मूर्तिकार तब्बल वर्षभर मेहनत घेत होते. अमेरिकेत ही मूर्ती पोहोचल्यानंतर मोठय़ा प्रमाणात प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यात आला. त्यात 300 पेक्षा अधिक हिंदू परिवारांनी सहभाग घेतला होता. या मूर्तीची स्थापना ‘द हनुमान प्रोजेक्ट’ अंतर्गत करण्यात आली आहे. यात अमेरिकेतील अनेक हिंदू लोक सहभागी आहेत.


























































