
>> डॉ. विजय पांढरीपांडे
सध्याच्या कोरोना संकटामुळे अनेक आपत्कालीन घटनांना सामोरे जाताना आपल्याला अनेक बदल करावे लागतील. नवे बदल स्वीकारावे लागतील. विशेषकरून शिक्षण क्षेत्रात या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाताना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तात्कालिक स्वरूपाचे अन् दीर्घकालीन स्वरूपाचे काय निर्णय घेता येतील याचा विचार शिक्षणाची गाडी रुळावर आणण्यासाठी करावा लागेल.
कोरोना संकटामुळे आपल्या अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. शिक्षण क्षेत्रही त्यातून सुटलेले नाही. या परिस्थितीत शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तात्कालिक आणि दीर्घकालीन उपाय योजावे लागतील. आधी तात्कालिक उपाययोजनांचा विचार करू. हा विचार दोन स्तरांवर करावा लागेल. एक शालेय शिक्षण अन् दुसरे महाविद्यालयीन म्हणजे विद्यापीठ स्तरावरील शिक्षण. त्यापैकी गेल्या शैक्षणिक सत्रातील राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे अन् नवे शैक्षणिक सत्र सुरू करणे या तीन महत्त्वाच्या बाबी असतील. अनेक शाळांतून राहिलेल्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रशिक्षण सुरू झाले आहे. अर्थात पारंपरिक वर्गातून मिळणाऱया शिक्षणाची, अभ्यासाची सवय झालेल्या विद्यार्थ्यांना हे शिकवणे कितपत पचेल, रुचेल हा प्रश्नच आहे. जास्तीत जास्त ग्रामीण भागात राहणाऱया बहुसंख्य विद्यार्थ्यांना ही नवी पद्धत, हे नवे तंत्रज्ञान कितपत आत्मसात करता येईल हा प्रश्न आहे. या बदलाला तयार नसलेल्या शिक्षकांपुढे देखील नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकवताना अनेक अडचणी येऊ शकतात. इंटरनेटची उपलब्धता, नवी पद्धत समजून घेण्यात शिक्षकांना, विद्यार्थ्यांना येणाऱया अडचणी याचाही विचार करावा लागेल. गेले काही दिवस मी शहरातल्या इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांच्या संपर्कात आहे. तेसुद्धा या बदलाला सामोरे जायला सर्व दृष्टीने सिद्ध नाहीत. वेल इक्विप्ड नाहीत. प्रशिक्षित नाहीत. मग ग्रामीण भागातील आर्टस्, सायन्सच्या फॅकल्टीतील प्राध्यापकांची गोष्टच वेगळी.
या परिस्थितीत स्वयं अध्ययनावर भर देणे उत्तम. झालेल्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत राहिलेला अभ्यासक्रम थोडाच असणार. कारण कोरोना संकट मार्चच्या मध्यावधीत सुरू झाले. त्यामुळे या उरलेल्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून अभ्यास करणे उत्तम. त्यासाठी पालकांची मदत घेता येईल. शेजारपाजारच्या हुशार विद्यार्थ्यांची मदत घेता येईल. (शारीरिक अंतर, मास्क वगैरेचे नियम पाळून) या अभ्यासक्रमावर आधारित गृहपाठ विद्यार्थ्यांनी सबमिट करावा. म्हणजे ते नेमके काय शिकले, त्याचा उद्देश काय, कुठे, कसा, उपयोग काय यावर आधारित टिपण लिहावे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आकलन, स्पष्टीकरण, प्रगटीकरण तपासता येईल.
आता परीक्षेचा प्रश्न… गुण, ग्रेडस् देण्याचा प्रश्न… आपली शालेय म्हणा किंवा महाविद्यालयीन म्हणा, एकूणच परीक्षा पद्धत चुकीची आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांचे उचित मूल्यमापन होतेच असा दावा करता येणार नाही. विद्यापीठाचे प्रशासन तर परीक्षा विभागाकरिता, मूल्यमापनाकरिता लाखो नव्हे, करोडो रुपये खर्च करते. याशिवाय कित्येक मनुष्य तास खर्च होतात ते वेगळेच. एवढे सगळे खर्ची घालून जे गुण प्रदान केले जातात, ज्या ग्रेडस् दिल्या जातात त्या तथाकथित विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे, आकलन शक्तीचे तंतोतंत प्रतीक असतात का? याचे उत्तर निसंदिग्धपणे ‘नाही’ असे आहे. आपले प्रश्नपत्र, आपली परीक्षा पद्धत, मूल्यांकन पद्धत, प्राध्यापकांचा पेपर तपासण्यातला, परीक्षा घेण्यातला एकूणच कॅज्युअल अप्रोच, विद्यार्थ्यांची मनोवृत्ती (टय़ुशन्सवर भर, प्रायव्हेट क्लासेसने माजवलेला गोंधळ) हे सारे त्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे एक वर्ष जर विद्यार्थ्यांची परीक्षाच घेतली नाही किंवा जे मूल्यमापन झाले त्यावर अवलंबून राहिले तर फारसे काही बिघडणार नाही. अर्थात जे विद्यार्थी, दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाला आहेत त्यांच्यापुरते तात्पुरते काही एक धोरण ठरवावे लागेल.
आयआयटी, एनआयटीसारख्या स्वायत्त संस्था यांची विद्यार्थी संख्या त्या मानाने मर्यादित असल्याने, शिकवणारे शिक्षकच मूल्यमापन करीत असल्याने फारशी समस्या येणार नाही. पण विद्यापीठाच्या आधीन असलेली संलग्नित महाविद्यालये, त्यातील लाखो विद्यार्थी यांचा खरा प्रश्न आहे. कारण आपल्या सिस्टिममध्ये अशा कॉलेजेस्च्या बाबतीत विश्वासार्हता शून्य असल्याने, परीक्षा, मूल्यमापन हे केंद्रिभूत असते. विद्यापीठ स्तरावरचे होते. दहावी/ बारावीच्या बोर्डाच्या बाबतीतदेखील अशीच समस्या असते. जोपर्यंत शिक्षणाचे, मूल्यमापनाचे विकेंद्रीकरण होत नाही. आपल्या सिस्टीममध्ये विश्वासार्हता वाढत नाही तोपर्यंत ही समस्या तशीच राहणार. थोडक्यात, शैक्षणिक सत्र रुळावर आणण्याच्या दृष्टीने खालील उपाययोजना करता येतील. 2019-20 चे राहिलेले सत्र ऑनलाइन शिकवणी अन् स्वयंअध्ययन, होमवर्क या पद्धतीतने पूर्ण करावे. शेवटच्या वर्षाला असणाऱया विद्यार्थ्यांच्या परीक्षा शक्यतो ऑनलाइन पद्धतीने मोजक्या अभ्यासक्रमावरच घ्याव्या. बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑलरेडी झालेल्या क्लासटेस्ट, असाईनमेंटस्, प्रोजेक्ट वर्क या आधारे सरासरी गुण देऊन प्रमोशन द्यावे.
पुढील 2020-21 या सदरासाठी वेगळे कॉम्पॅक्ट कॅलेंडर तयार करावे. प्रत्येक वेळी सगळे काही वर्गातच शिकविले पाहिजे हा अट्टहास सोडावा लागेल. मुलांना जास्तीत जास्त गृहपाठ द्यावेत, स्वतः वाचायला, अभ्यासायला प्रवृत्त करावे. जे वाचले, अभ्यासले त्यावर आधारित टिपणे काढायला, जे आत्मसात केले ते स्वतःच्या शब्दात एक्सप्रेस करायला बाध्य करावे. त्यावर मूल्यमापन करावे.
विज्ञान, तंत्रज्ञान, फार्मसी अशा अनेक अभ्यासक्रमाला प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके महत्त्वाची असतात. त्यासाठी 9 ते 4, 10 ते 5 अशा ठराविक वेळेची सवय बदलावी लागेल. प्रयोगशाळा चोवीस तास उघडय़ा ठेवाव्या लागतील. त्यासाठी कर्मचारी, प्राध्यापक आळीपाळीने येतील. आपल्याला कार्यालयीन वेळाची संकल्पनाच बदलावी लागेल. काही वर्ग संध्याकाळी, रात्री घ्यावे लागतील. कंटिन्युअस असेसमेंटचा पर्याय स्वीकारावा लागेल. तोंडी प्रश्न, प्रात्यक्षिके, प्रकल्प या वेगवेगळ्या संकल्पनांद्वारे मूल्यमापन करावे लागेल. हे मूल्यमापन पारदर्शी अन् योग्य व्हावे यासाठी ते एकछत्री न ठेवता सामुदायिक पद्धतीने करता येईल. हे सगळे योग्य तर्हेने अमलात आणण्यासाठी प्रशासन, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक यांच्यात सामंजस्याचे, विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. सद्यःस्थितीचे आगळेवेगळे स्वरूप ध्यानात घेता उपाययोजनादेखील नावीन्यपूर्ण, अभूतपूर्व अशाच असतील. एकूण न भूतो न भविष्यति अशा बदलाला सामोरे जायला आपणा सर्वांना तयार व्हावे लागेल.





























































