एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य लोकसेवा आयोगातर्फे जुलै 2019मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत साताऱ्याचा प्रसाद चौगुले यांनी बाजी मारली असून सर्वसाधारण गटातून त्याने प्रथम क्रमांक पटकाविले आहे. तर मागासवर्गीय गटातून धाराशीव येथील रवींद्र शेळके हे प्रथम आले आहेत. तर पर्वणी पाटील हिने महिला गटातून प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले आहे.

राज्य लोकसेवा आयोगातर्फे 13 जुलै ते 15 जुलै 2019 या काळात ही मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. एपूण 420 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल आज आयोगाने आपल्या वेबसाईटवर जाहीर केला आहे. या पदांच्या पर्व परीक्षेकरिता 3 लाख 60 हजार 990 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. यामधून राज्य सेवा (मुख्य) परीक्षेकरिता 6 हजार 825 उमेदवार पात्र ठरले होते. यापैकी 1 हजार 326 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या एकूण उमेदवारांच्या आरक्षणाच्या व इतर अन्य मुद्दय़ांच्या संदर्भात विविध न्यायालयात,  न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा  उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविण्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे आयोगाने निकाल जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.