पहिल्या लॉटरीमध्ये 1 लाख विद्यार्थ्यांची निवड, आरटीईचे 25 टक्के प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लॉकडाऊनमुळे रखडलेला आरटीईनुसार 25 टक्के राखीव जागांसाठी राबविण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या लॉटरीद्वारे राज्यातील सुमारे एक लाख 929 विद्यार्थ्यांची निवड झाली असून 75 हजार 465 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत.

लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी आणि संकलन यंदा शाळा स्तरावर करण्यात येणार असून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश दिले जाणार आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांसाठी होणाऱया प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रांची पडताळणी ही समितीकडे जाऊन करणे अशक्य आहे. म्हणूनच फक्त या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर पडताळणी होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी असणाऱया अधिकृत पोर्टलवर शाळांच्या लॉगिनला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक दिलेला आहे. त्यानुसार संबंधित क्रमांकावर प्रवेशाबाबत तारीख वेळ कळवावी. आणि पालकांची गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने प्रवेशाचे नियोजन करावे, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी शाळांना दिले आहेत.

लॉकडाऊनमुळे या प्रवेशप्रकियेचे पुढील काम अपूर्ण राहिले. आता ही प्रक्रिया राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे प्रवेशाचे नियोजन करण्यात येत आहे. आरटीई प्रवेशाच्या अधिकृत पोर्टलवर येत्या बुधवारनंतर (ता. 24) विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अर्जाचा नंबर टाकल्यास शाळेने प्रवेशासाठी किती तारखेला बोलाविले आहे, ही माहिती मिळू शकणार आहे, असेही शिक्षण विभागाने नमूद केले आहे.

पालकांसाठी सूचना
शाळांनी प्रवेशाबाबत एसएमएस पाठविल्यावर दिलेल्या कालावधीत मुळ कागदपत्रे आणि छायांकित प्रत घेऊन शाळेत जावे
दिलेल्या कालावधीत जाणे अशक्य असल्यास, शाळेला कळवावे आणि पुढील तारीख घ्यावी
केवळ शाळांच्या मेसेजवर अवलंबून न राहता पालकांनी प्रवेशाच्या पोर्टलवर अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाच्या कालावधीची खात्री करावी.
पोर्टलवरील पालकांसाठी असणाऱया सूचनांचे पालन करावे.
अर्जातील माहिती चुकीची आढळल्यास हमीपत्रातील अटीप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

प्रवेशावेळी शाळांनी घ्यायची काळजी
प्रवेशासाठी गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने पालकांना बोलविण्यासाठी नियोजन करावे
प्रवेशाचे वेळापत्रक प्रवेशद्वारावर लावावे
कागदपत्रांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर पालकांना अॅलॉटमेट लेटर द्यावे आणि तात्पुरता प्रवेशाची नोंद करावी आणि हमीपत्र घ्यावे.
पालकांना प्रवेशासाठी तिनदा संधी द्यावी.
तात्पुरता प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रमात सहभागी करून घ्यावे.
शाळांनी पालकांकडून संकलित केलेल्या कागदपत्रे पडताळणी समितीकडे घेऊन जावे आणि प्रवेश निश्चित करावा.
प्रतीक्षा यादीतील पालकांबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येणार आहेत.
कोरोनाबाधित क्षेत्रात किंवा त्यासाठी शाळा ताब्यात घेतली असल्यास अटी शिथिल झाल्यानंतर कार्यवाही व्हावी.