
मालवणातील कालावल खाडी पात्रात कोईल गावाच्या किनारी अनधिकृत वाळू उपशासाठी सक्शन पंप लावल्याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी शनिवारी दिली. सक्शन पंपप्रकरणी स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने शुक्रवारी धडक कारवाई करत बोटीसह सक्शन पंपावर डिझेल ओतून आग लावली होती. सर्व साहित्य उद्ध्वस्त करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचनामाही करण्यात आला.
पंचनाम्यात नोंद केल्यानुसार सक्शन पंप पाईप ज्या ठिकाणी होता, त्या लगतची सामाईक मालकीची जागा मूळ मालकाने एका व्यक्तीस 5 वर्षांच्या करारावर गेल्या वर्षी दिल्याची माहिती नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार जबाब नोंद केले जाणार आहेत. रात्रीच्या वेळी अनधिकृत पध्दतीने सक्शन पंप लावून वाळू उत्खनन, वाहतूक होत असल्याचीही नोंद पंच यादीत करण्यात आली आहे. केव्हा पासून हा सगळा प्रकार सुरू होता, यासह सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार पाटणे यांनी दिली आहे.





























































