मास्कवरही जरतारीचा मोर नाचरा हवा… महिलांमध्ये आता ‘पैठणी’ मास्कची क्रेझ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसक शालू नवा कौटुंबिक कार्यक्रम असले की महिलांना आकर्षण असते ते मराठमोळ्या पैठणीचे! मात्र कोरोनामुळे लग्नसमारंभ, कौटुंबिक कार्यक्रमच रद्द झाले आहेत. त्यामुळे यंदा महिलांना पैठणीची हौस पूर्ण करता आली नाही. परंतु, सध्या महिला आपली हौस पैठणी साडीवर असलेल्या मोरांच्या डिझाईन्सचा वापर करून तयार केलेल्या आकर्षक ‘पैठणी’ मास्कने पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनामुळे मास्क वापरणे सर्वांसाठीच बंधनकारक झाले आहे. मात्र, त्यातही अनेकजण रंगीबेरंगी, कार्टूनचे डिझाईन असलेले मास्क वापरून आपली हौस भागवून घेत आहेत. एकाने तर चांदीचाच मास्क तयार करून घेतला होता. त्याचे फोटोही सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. त्यात आता मराठमोळ्या पैठणी मास्कची भर पडली आहे.

धनाज पैठणी पर्सेस हाऊसच्या धनश्री पाठक यांनी पैठणीवर असलेल्या मोरांच्या डिझाईन्सचा वापर करून साडी, ड्रेसिंगवर मॅचिंग होईल आणि रोज धुवून वापरता येतील, असे पैठणी मास्क तयार केले आहेत. हा मास्क दोन लेअरमध्ये असून, मास्कची वरची लेअर सेमी पैठणीची तर आतील लेअर सॉफ्ट कॉटनमध्ये बनवलेली आहे. पुरुषांसाठीही आकर्षक खादी मास्क बनवण्यात आले आहेत. दिसायला आकर्षक आणि दररोज धुवून वापरता येत असल्याने महिलांची या मास्कला जास्त पसंती मिळत आहे.

धनश्री पाठक म्हणाल्या, ‘कोरोनामुळे पैठणी मास्क करण्याची संकल्पना डोक्यात आली. हे मास्क फक्त फॅशन म्हणून बनवले नाहीत तर, कोरोना विषाणूपासून संरक्षण आणि दररोज धुवून वापरता यावे यादृष्टीने पारंपरिकतेला आधुनिकतेचा साज देत हे मास्क बनवले आहेत. लग्नसमारंभासाठीही वधू-वरासाठी विशेष मास्क बनविले आहेत. या मास्कला लग्नसमारंभासाठी मोठी मागणी आहे.

वधूसाठी ‘प्रीमियम पैठणी’ मास्क
लग्न समारंभात वधू-वरासाठी ‘प्रीमियम पैठणी मास्क आणि खादी मास्क’चे पॅकेज तयार करण्यात आले आहे. लग्नात वधूचा मेकअप, हेअरस्टाईल व्यवस्थित राहावी आणि कोरोनापासून संरक्षण  व्हावे यासाठी तीन लेअर असलेला ‘प्रीमियम पैठणी मास्क तर वरासाठी प्रीमियम खादी मास्क तयार करण्यात आला आहे.