
एरव्ही हातात संगणकाचा माऊस हातात घेऊन रोजीरोटी कमावणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांच्या हातात आता बैलाचा कासरा आला आहे. कोरोनाच्या भीतीने गावाकडे परतलेल्या लाखो मुंबईकरांपैकी अनेकांनी आईला बजावूनच ठेवले आहे…‘गे आये, आता गणपती करूनच मी मुंबैक जातंय…’ चाकरमानी गाववाले झालेले आहेत.
कोरोनाचे संकट आले आणि कोकणच्या मुंबईतील चाकरमान्यांनी आपल्या गावची वाट पकडली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात मिळून तब्बल दीड लाखांवर चाकरमानी दाखल झाल्याचे सांगण्यात येते. मुंबई-पुण्यातील कोरोनाची स्थिती पाहता अनेकांनी आता गणपतीनंतरच मुंबईला जाण्याचे ठरवले आहे. मग तोपर्यंत करायचे काय?
दहा बाय बाराच्या खोलीतील नाहीतर सहाशे स्क्वेअर फुटातील अख्खे बिऱहाडच गावी पोहोचले आहे. आंबे, फणस खाऊन झाले. आता हे चाकरमानी कुटुंब शेतीत रमले आहे. हातात बैलाचा कासरा आला आणि ‘इरी इरी पापारी’ म्हणत नांगर धरला जात आहे. ही पेरणी आटोपली की मग गणपतीची तयारी सुरू होईल.
आम्ही गावी आल्यावर आमच्या काजूच्या बागेत काम करतोय. पूर्वी आम्ही शेती दुसऱयाला करायला देत होतो. परंतू गावी असल्याने यंदा आम्हीच शेती करतोय. माझ्या मुलांना शेतीबद्दल माहिती नव्हती. त्यांनी पहिल्यांदाच पेरणी, लावणी कशी करतात. कसं शेत नांगरतात हे अनुभवलं आणि त्यांनाही शेतीविषयी आवड निर्माण झालीय. दरवर्षी गणपतीला आम्ही गावी असतो यंदा गणपती नंतरच मुंबईत परत जाण्याचा आमचा विचार आहे. – अशोक बाईत, निवळी, रत्नागिरी
































































