
मुंबईला वेगवान बनवणाऱ्या पालिकेच्या महत्त्वाकांक्षी ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाचे काम कोरोनाच्या प्रभावातही आवश्यक खबरदारी घेऊन गेल्या तीन महिन्यांपासून वेगात सुरू आहे. विशेष म्हणजे काम करणाऱया 400 पैकी फक्त एका कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाली. त्यानेदेखील कोरोनावर मात केली. कोस्टल रोडचे मुख्य अभियंता विजय निघोट यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘कोस्टल रोड’मुळे मुंबईचे दक्षिण टोक प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी-लिंकपर्यंत मुंबईकरांना वेगात आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे. यामुळे मुंबईकरांची 70 टक्के वेळेची बचत होणार असून आणि 34 टक्के इंधनाची बचत होणार असल्याने प्रदूषण थांबण्यासही मदत होणार आहे. मात्र कोरोनाचा प्रसार असताना कोस्टल रोडचे काम कसे होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र सोशल डिस्टंसिंग, निर्जंतुकीकरण आणि आवश्यक खबरदारी घेऊन 400 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे काम सध्या सुरू आहे.
लॉकडॉऊनमुळे परत गेलेले सुमारे 100 कर्मचारीही पुढील आठवडय़ात पुन्हा कामावर येणार असल्यामुळे कामाला आणखी गती मिळणार आहे. सध्या पायलिंग, काँक्रिटीकरण, रेक्लमेशनची विविध कामे सुरू आहेत. सध्या एकूण कामापैकी 10 टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे. दरम्यान, प्रिंन्सेस स्ट्रिट ते वरळी सी-लिंक या 9.98 किमी मार्गासाठी 3.45 किमी लांबीचा बोगदा खोदावा लागणार आहे. हा बोगदा खोदण्यासाठी आणलेली देशातील सर्वात मोठी टनेल मशीन बसवण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे.
असा केला कामगारांचा बचाव
कामगार-अधिकारी कामावर आल्यानंतर इंट्री आणि जाताना एक्झिट पॉइंटवर थर्मल क्रिनिंग करण्यात येत आहे.
कामावर कामगारांना मास्क, हँडग्लोव्हजसह वेळोवेळी सॅनिटायझर देऊन निर्जंतुकीकरणावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
या शिवाय कामगारांमध्ये सोशल डिस्टंन्सिंग पाळून काम करण्यात येत आहे.
कामगार राहणाऱया ठिकाणाहून आणण्यासाठी आणि त्यांना घरी पोहचवण्यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था. शिवाय वाहनातही सोशल डिस्टंन्सिंगचे पालन.
विशेष म्हणजे कामगारांना वेळोवेळी कोरोना टाळण्यासाठी, आवश्यक असणारे प्रशिक्षणही देण्यात आले.


























































