
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूमुळे एकीकडे त्याचे चाहते, सहकलाकार यांना धक्का बसला आहे, तर दुसरीकडे राखी सावंत हिने एक धक्कादायक दावा केला आहे. सुशांत सिंह राजपूत माझ्या स्वप्नात आला होता आणि त्याचा पुनर्जन्म होणार आहे. तो माझ्या पोटी जन्म घेईल, असे राखी सावंत हिने म्हटले आहे. राखी सावंत हिने याबाबत एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
रात्री मी झोपेत असताना अचानक मला जोराचा झटका बसला. मी विचारले कोण आहे? तर समोरून उत्तर आले मी सुशांत. सुशांत सिंह राजपूत माझ्या स्वप्नात आला आणि मला मी पुनर्जन्म घेणार असे म्हणाला. माझ्या चाहत्यांना सांग मी पुन्हा जन्म घेतोय, असे राखी म्हणाली.
यावर मी त्याला कसे काय? असे विचारले. तेव्हा त्याने मी तुला लवकरच सांगेल असे म्हटले. मी त्याला आत्ताच सांग असे म्हणाले. तेव्हा सुशांतने राखी तू लग्न करशील आणि मी तुझ्या पोटी जन्म घेईन, असे म्हटल्याचे राखीने सांगितले.
चाहत्यांचा संताप
दरम्यान, राखी सावंत हिच्या या व्हिडिओवर आणि तिने केलेल्या दाव्यावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. इन्स्टाग्रामवर राखीला चाहत्यांनी चांगलेच सुनावले आहे. अनेकांनी तिला नशा करून बसलीय असे म्हटले तर काहींनी तू आमच्या नजरेतून उतरली, अशी कमेंट केली आहे.






























































