
जग सध्या कोरोनाच्या जागतिक संकटाशी मुकाबला करत आहे. त्यातच हिंदुस्थानचा नेपाळ आणि चीनशी सीमावाद सुरू असल्याने हिंदुस्थानात या वादात गुंतला आहे. देशातील कोरोनाचा फैलाव रोखत सीमावाद शांततेने सोडवण्यालर हिंदुस्थानचा भर आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक सहयोग संघटनेची (ओआयसी) बैठक हिंदुस्थानसाठी धोक्याचा इशारा ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओआयसी जम्मू कश्मीरच्या मुद्द्यावर सोमवारी आपत्कालीन बैठक घेत आहे. ही बैठक घेण्याची मागणी पाकिस्तानकडून होत होती. आता हिंदुस्थान कोरोना संकटाचा मुकाबला करत असताना आणि शेजारी देशांशी तणाव निर्माण झाला असतानाच ही बैठक होत असल्याने बैठकीच्या हेतूबाबतच शंका उपस्थित होत आहेत.
ओआयसीची ही बैठक सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. त्यात कश्मीरच्या सद्यस्थितीवर चर्चा होणार आहे. जम्मू कश्मीर कॉन्टॅक्ट ग्रुपचे सदस्य देश अजरबैजान, नाइजर, पाकिस्तान, सौदी अरब आणि तुर्कस्तान या बैठकीत सहभागी होतील. जम्मू कश्मीरच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठक होत असल्याचे ओआयसीचे सेक्रेटरी जनरल डॉ. युसूफ अल ओथाईमीन यांनी सांगितले. जम्मू कश्मीरबाबत होणाऱ्या बैठकीचाच ही बैठक एक भाग आहे. या संघटनेत 67 देशांचा समावेश असून ही संघटना मुस्लीम देशांचा आवाज म्हणून ओळखली जाते. याआधी सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत कॉन्टॅक्ट देशांनी जम्मू कश्मीरच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावर हिंदुस्थानने आक्षेप नोंदवला होता.
कश्मीरच्या मुद्द्यावर ओआयसीने हिंदुस्थानविरोधात कारवाई करावी, अशी पाकिस्तानची मागणी आहे. मात्र, सौदी अरब आणि संयुक्त अरब आमिरात या देशांनी पाकिस्तानच्या मागणीकडे फारसे लक्ष दिले नसल्याचे पाकिस्तानची निराशाच झाली आहे. मात्र, हिंदुस्थान सध्या कोरोना आणि इतर संकटाशी सामना करत असताना कश्मीर मुद्द्यावर ओआय़सीने आपत्कालीन बैठक बोलावल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र, सौदी अरब आणि संयुक्त अरब आमिरातचे हिंदुस्थानशी चांगले संबंध असल्याने हिंदुस्थानसाठी दिलासादायक बाब आहे. कश्मीर मुद्द्यावर मुस्लीम देशांना एकत्र करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. मात्र, सौदी आणि यूएईच्या सहमतीशिवाय कोणेताही निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानने तुर्कस्तान, मलेशिया आणि ईराण या देशांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. या देशांनी ओआय़सीपेक्षा वेगळा सूर लावला. त्यातही त्यांना फारसे यश आले नाही. हा हिंदुस्थानचा राजनैतिक विजय आहे. मात्र, अशा परिस्थितीत होणारी बैठक चिंता वाढवणारी आहे. मात्र, सद्यस्थितीत हिंदुस्थान, चीन किंवा पाकिस्तान कोणालाही नाराज करून सौदीला परवडणारे नाही. त्यामुळेस सौदी काय भूमिका घेणार, त्य़ावर ओआयसीची पुढील दिशा ठरणार आहे.

























































