बीडमध्ये आणखी चार जण कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची संख्या 110 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दोन दिवसात बीड शहरामध्ये 8 रूग्ण वाढले होते. तर जिल्ह्यामध्ये 14 रूग्णांची भर पडली होती. सोमवारी बीड शहरामध्ये 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे कोरोनाबाधित रूग्ण छोटी राजगल्ली भागातील आहेत.

बीड जिल्ह्यातून 67 रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात बीडमधून 36, जिल्हा रूग्णालयातून 8, अंबााजेगाईतून 19, तर स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयातून 4 असे एकूण 67 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्रतिक्षेत होते. हे अहवाल सोमवारी मिळाले आहेत. त्यात बीड शहरातील 4 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बीड शहरवासियांची चिंता वाढत आहे. एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे नागरिक नियम पाळत नसल्याचे दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याने कोरोनाचे फैलाव होत आहे. तसेच अनेक दुकानांमध्ये गर्दी होत आहे. अनेकजण मास्कही वापरत नसल्याचे दिसले आहे. त्यामुळे चिंतेत भर पडत आहे. सोमवारी आढळलेल्या रूग्णांमुळे बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 110 वर पोहचली आहे. आज 63 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये 30 वर्ष वयाची स्त्री तर 38, 27 वर्षाचे पुरुष आणि 10 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.