गोव्यात बंद पडलेले उद्योग तसेच बेरोजगारी यावर नितीन गडकरींचे मौन का? काँग्रेसचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचा पिंड फसवणुकीचा आहे हे नितीन गडकरीनी पटवुन दिले आहे. भाजप सरकारच्या  आश्वासनांचे गाजर फेक असल्याचे गोमंतकीयांना कळुन चुकले असल्याची टीका काँग्रेस पक्षाने केली आहे. रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधीत केलेल्या व्हर्च्युअल रॅलीतील  मुद्दयांवर अनेक  प्रश्न उपस्थित  करुन काँग्रेस पक्षाने भाजपवर टीका केली आहे.

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत,  प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यानी आज काँग्रेस भवनात  पत्रकार परिषद घेऊन गोमंतकीयांच्या तातडीच्या गरजा भाजप सरकार पुरविण्यास असमर्थ ठरल्याचा आरोप केला.

गोव्यात खाण व्यवसाय भाजपने परत सुरू केला, असे धादांत खोटे बोलुन नितीन गडकरी यांनी सदर उद्योगावर अवलंबुन असलेल्या व मागची 8 वर्षे हाल  सहन करीत असलेल्या गोमंतकीयांच्या जखमेवर मिठ चोळले आहे. भाजप खाण व्यवसाय सुरू करण्यावर केवळ आश्वासने देत असुन, खरेपणी त्यांना खाण उद्योग बंदच ठेवायचा आहे असा गंभीर  आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.

आज गोवा सरकार कर्जावर कर्ज काढत असुन, केंद्र सरकारकडुन येणारा गोव्याचा हक्काचा 750 कोटीचा जीएसटीचा वाटा देणे ही मोदी सरकारला शक्य झालेले नाही. यावरुन केंद्र सरकारने देशाची अर्थव्यवस्था डबघाईत आणल्याचे स्पष्ट होते. गोवा सरकारने मागीतलेल्या  2 हजार कोटी  पॅकेज मधुन एक रुपया अजुन आलेला नाही हे  मुख्यमंत्र्यीच मान्य करतात. प्रधानमंत्र्यानी जाहीर केलेल्या 20 लाख कोटीतुन गोव्याला काय मिळाले हे न बोललेलेच बरे अशी टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी केली.

गोव्याची अर्थव्यवस्था पुर्नजीवीत करण्यासाठी आज लोकांना आर्थिक मदतीची गरज असुन, काग्रेस पक्षाने मागणी केलेली कष्टकरी गोमंतकीय व्यावसायीकांसाठीची केवळ 100 कोटीची पॅकेज देणे सुद्धा भाजप सरकारला शक्य झालेले नाही असे  कामत यांनी सांगीतले.  भाजपच्या हुकूमशाही व अनागोंदी कारभाराला जनता कंटाळली असुन, सरकारने ताबडतोब लोकांना दिलासा देणारी आर्थिक पॅकेज जाहिर न केल्यास जनता रस्त्यावर येण्यास मागे राहणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवावे असा इशारा  काग्रेस पुढाऱ्यानी दिला आहे.