
सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडला घराणेशाहीवरून लक्ष्य केलं जात आहे. अनेकांनी या वादात उडी घेतली असून त्यात एक नाव सोनू निगम याचं आहे. नुकतंच त्याने एका व्हिडीओवरून संगीत क्षेत्रातही असे प्रकार चालत असल्याची टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना एका संगीत क्षेत्रातील निर्मात्याची पत्नी संतापली असून तिनेही पोस्ट टाकत आपलं मत व्यक्त केलं आहे.
काही दिवसांपूर्वी सोनू निगम याने त्याच्या अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्याने बॉलिवूडप्रमाणेच संगीत क्षेत्रातही अशी घराणेशाही चालत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्याने अजून एक व्हिडीओ शेअर करून टी-सीरीजचे प्रमुख भूषण कुमार यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यात भूषण कुमार यांनी चुकीच्या व्यक्तिशी शत्रुत्व केल्याचं त्याने म्हटलं होतं. तसंच, एकेकाळी कामासाठी आपल्याकडे खेटे घातल्याचा उल्लेखही त्याने केला होता. तसंच भूषण यांनी सहा सेलिब्रिटींना आपल्याविरोधात मुलाखती देण्यास सांगितलं आहे, असा आरोपही त्याने केला होता.

त्यावर प्रत्युत्तर देताना भूषण कुमार याची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या कुमार खोसला हिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून टीका केली आहे. आज अनेक जण आपलं कॅम्पेन कसं चालवतात, त्यावर बरंच काही अवलंबून असतं. काही माणसं खोटं विकतात आणि आपले हेतू साध्य करतात. सोनू निगम अशा माणसांपैकी एक आहे. लोकांच्या मनाशी कसं खेळायचं ते त्यांना उत्तम जमतं. देव अशा माणसांपासून सर्वांचं रक्षण करो, असं दिव्या हिने म्हटलं आहे.

पुढे ती म्हणाली की, सोनू निगम, तुम्हाला या इंडस्ट्रीत टी सीरीजने ब्रेक दिला. तुमच्या प्रगतीला मदत केली. तुमचा भूषणच्या वागण्यावर आक्षेप होता, तर तुम्ही तो आधीच का सांगितला नाहीत. आज फुकट प्रसिद्धी कशाला मिळवताय. तुमच्या वडिलांचे अनेक व्हिडीओ मी स्वतः दिग्दर्शित केले आहेत, त्यासाठी ते नेहमीच कृतज्ञ राहिले आहेत. पण काही माणसं कृतघ्न असतात, अशी घणाघाती टीका दिव्या खोसला कुमार हिने केली आहे.



























































