
बीड लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुत्तेदारांच्या संगनमताने कोट्यवधी रूपयांचा घोटाळा केला होता. निवडणुकीच्या काळात देण्यात आलेल्या मंडपाचे बील तब्बल 9 कोटी रूपये आकारण्यात आले. या घोटाळ्याचा पर्दाफाश ‘दै.सामना’ ने केला होता. तक्रारीनंतर पथक नेमण्यात आले. चौकशी झाली, आता विभागीय आयुक्त यांनी चौकशीचा अहवाल निवडणुक आयोगाकडे सादर केला आहे. अहवाल निवडणुक आयोगाच्या दरबारात पोहचल्याने घोटाळेबाज अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बीड लोकसभा, विंधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने आलेला निधी खर्च केला. वारेमाप खर्च दाखवून निवडणुक आयोगाच्या निधीची लुट केली. निवडणुकीच्या काळात देण्यात आलेल्या मंडपचे बील तब्बल 9 कोटीच्या घरात होते. असेच कोटीच्या कोटी आकडे इतर खर्चाचेही दाखवण्यात आले होते. निवडणुकीत झालेला हा खर्च बघून सामान्य माणसांनी डोळे विस्फारले होते. अधिकाऱ्यांनी गुत्तेदारांना हाताशी धरून मनमानी केली होती.
या सर्व घोटाळ्याचा पर्दाफाश दै. सामनाने केला होता. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली होती. ही समिती बीडमध्ये दाखल झाली. चौकशी सुरू असताना घोटाळेबाज अधिकारी चौकशी समितीच्या दिमतीला होते. अशा परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनी पारदर्शक चौकशी केली नसल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा समिती नेमून चौकशी करण्यात आली. या समितीने आपला अहवाल विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्याकडे सादर केला. त्याच दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाल्याने निवडणूक घोटाळ्याचे हे प्रकरण पेंडींग पडले होते. मात्र दोन दिवसापूर्वी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी पुन्हा तो अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. अहवाल निवडणूक आयोगाकडे पोहचल्याने घोटाळेबाज अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.




























































