
मानखुर्दच्या मंडाला विभागात मंगळवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत 15 गोदामे जळून खाक झाली. सकाळी 6 वाजता लागलेली आग आणि सध्या गोदामे बंद असल्याने या ठिकाणी कामगार नव्हते. त्यामुळेच सुदैवाने या आगीत जीवितहानी टळली.
मानखुर्दच्या या विभागान भंगारची अनेक गोदामे आहेत. यामध्ये रबर, पेपर, प्लॅस्टिक, इलेक्ट्रिक, फर्निचरच्या गोडाऊनचा समावेश आहे. शिवाय या भागात काही केमिकल गोडाऊन असल्याचेही समजते. या ठिकाणी सकाळी ६ वाजता आगीची ठिणगी पडली. गोदामातील प्लॅस्टिक, रबर, फर्निचर आणि काही केमिकलमुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे ही आग ‘लेव्हल-3’ची असल्याचे जाहीर करण्यात आले. आगीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या पालिकेच्या अग्निशमन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाच्या एकूण 20 गाड्या-फायर इंजिन-जम्बो टँकरच्या मदतीने 10.30 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यानंतर कूलिंग ऑपरेशन उशिरापर्यंत सुरू होते. आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नसून चौकशी सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
परिसरात प्रचंड घबराट
घाटकोपर मानखुर्द लिंक रोडपासून काही अंतरावर असलेल्या या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ साठवले जात असल्याने या ठिकाणी वारंवार आगी लागण्याचे प्रकार घडतात. गोदामांना लागूनच लोकवस्ती आहे. ही आग लागताच आगीचे प्रचंड लोळ, धूर परिसरात पसरल्याने रहिवाशांमध्ये खबराट पसरली. त्यामुळे लोक आरडाओरडा करीत घराबाहेर पडले.
























































