कोरोना आणि सामाजिक अंतराचे महत्त्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< डॉ. सतीश नाईक  >> 

सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की कोरोनाचे विषाणू आपल्या श्वासातून आत शिरणार नाही याची काळजी घ्यायची हे बरोबर. पण प्रश्न आला की काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं? साध्या शब्दात सांगायचं तर इतर लोकांच्या श्वसनापासून सुरक्षित अंतर राखायचं. त्यांच्या उच्छ्वासातून बाहेर निघणारे विषाणू आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचणार नाहीत याची दक्षता घ्यायची. यालाच आपण सामाजिक अंतर हा शब्द वापरतो आहोत.

सध्या एका गोष्टीबद्दल सगळ्या जगाची खात्री झाली आहे. कोरोना आलाय तो इथं राहायला. माणसं त्याला आवडलीत. भाकितं आहेत की, त्याचा मुक्काम काही वर्षांसाठी असणार आहे. तोपर्यंत घरी बसून राहणं परवडणारं नाही. एकदा हे सत्य स्वीकारलं की आपल्यापुढे कोरोनाच्या त्रासापासून स्वतःचा बचाव करण्याचा एकच पर्याय उरतो. म्हणून त्याविषयी जाणून घ्यायला हवं.

कोरोनामध्ये आपण एकमेकांपासून अंतर का ठेवायचं? आपले हात वारंवार का धुवायचे? लागण झाल्यावर स्वतःला एका खोलीत कोंडून का घ्यायचं? मनात प्रश्नांची खूप दाटीवाटी आहे. गोंधळात टाकणाऱया माहितीतून नक्की खरं आणि शास्त्राrय काय हे शोधून काढणं महत्त्वाचं आहे. तेच आपण करणार आहोत. नुसती माहिती देण्यापेक्षा असं का करायचं तेही समजून घेणार आहोत.

विषाणूला जिवंत राहायला नवनवी ‘कुडी’, नवंनवं शरीर लागणार. तेच त्याला मिळू दिलं नाही तर तो आपसूकच मरणार. कोरोना शिंकेतून किंवा खोकल्यावर जो फवारा उडतो त्याद्वारे पसरतो. त्यामुळं ठराविक अंतरापर्यंत असलेल्याच दुसऱया शरीरात प्रवेश करू शकतो. त्यापेक्षा लांब अंतर तो गाठू शकत नाही हे आपल्याला कळलंय. आपण विषाणूपासून तितक्या अंतरावर राहिलो की तो संपलाच. मुळात विषाणूचा गुणधर्म जसा असतो तसा त्याला दूर ठेवायचा आपला प्रयत्न असणार नाही का! एड्स लैंगिक संबंधातून, रक्ताच्या माध्यमातून होतो हे समजलं तेव्हा आपण तशी काळजी घेऊन त्यावर विजय मिळवला. कोरोना श्वसनाशी संबंधित असल्यानं दुसऱया व्यक्तीच्या श्वासाच्या कक्षेत न येणं, इतरांपासून चार हात लांब राहणं म्हणजे त्यावर विजय मिळवल्यासारखं होतं.

सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की कोरोनाचे विषाणू आपल्या श्वासातून आत शिरणार नाही याची काळजी घ्यायची हे बरोबर. पण प्रश्न आला की काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं? साध्या शब्दात सांगायचं तर इतर लोकांच्या श्वसनापासून सुरक्षित अंतर राखायचं. त्यांच्या उच्छ्वासातून बाहेर निघणारे विषाणू आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचणार नाहीत याची दक्षता घ्यायची. यालाच आपण सामाजिक अंतर हा शब्द वापरतो आहोत.

अंतर किती असावं हे आता सर्वश्रुत आहे. दोन व्यक्तींमध्ये किमान एक मीटर अंतर राखलं जावं हा संकेत आहे. इथं किमान म्हटलंय. म्हणजे कमीतकमी. पण समोरचा माणूस खोकत असेल, शिकत असेल तर अंतर जास्त, जिथं शक्य आहे तिथं दोन मीटर हवं. एखादा माणूस शिंकतो तेव्हा त्याच्या नाकावाटे बाहेर पडणारा फवारा सरासरी सहा ते आठ फूट लांब जातो. आपण त्या कक्षेबाहेर असलं पाहिजे. खोकला असो की शिंक दोन्हीमध्ये फुफ्फुसांतून, श्वसनमार्गातून जोरात बाहेर पडणारे रोगजंतू जास्त धोकादायक. ते जंतू तशी 100 किलो मीटर वेगाने बाहेर पडतात. शिवाय ते बराच मोठा परीघ व्यापतात. वेग आणि व्यापला जाणारा भाग दोन्ही अधिक असल्यानं खोकणाऱया व शिंकणाऱया व्यक्तीपासून आपण जितकं लांब राहू तितकं बरं. एकमेकात पुरेसं अंतर ठेवण्याच्या कल्पनेमागे हे शास्त्र आहे. आपल्या देशाची लोकसंख्या आणि लोकांची घनता पाहता हे कितपत शक्य होईल हे सांगता येत नाही. पण शक्यतो अंतर सोडण्याचा प्रयत्न असावा.

यातला सर्वात कठीण भाग म्हणजे स्वतःला तशी सवय लावून घेणं. इतकी वर्षं आपण जे केलं नाही ते सहज अंगवळणी पडणं अवघड असतं. सगळ्यांनाच बसमध्ये चढायचं असतं. शिस्तीनं एकामागोमाग एक चढलो तर कमी वेळ लागतो हे माहीत असूनही बस आली की स्टॉपवर उभे असलेले सगळे एकदम दरवाजावर हल्लाबोल करतात. त्यानं दाटीवाटी होते. ‘मी आधी’ म्हणताना सगळेच अडकून बसतो. बससारखीच गत कुठल्याही वाहनांची असते. ट्रेनमध्ये, विशेषतः मुंबई वगैरेबद्दल तर विचारूच नका. काहीही करून मध्ये घुसणं हा आपला स्वभाव झाला आहे. त्यामुळं धक्काबुक्की, इतकंच कशाला प्रसंगी चक्क मारामारीसुद्धा करायला आपण मागेपुढे पाहात नाही. भांडलो, एकमेकांची गचांडी धरली म्हणजे आपलं काम लवकर होतं हा आपला गैरसमज आहे. असलं काहीही न करता कित्येक प्रगत देश आपापली कामं अचूक वेळेवर करताहेत हे लक्षात ठेवायला हवं.

साधं भाजी घ्यायला आपण निष्कारण गर्दी करतो. शेवटी तो भाजी विकणारा एकटाच असतो. त्याला दोनच हात असतात. एकावेळी तो एकाच व्यक्तीला हवं ते देऊ शकतो. मग चारी बाजूंनी त्याला घेरून आपण काय मिळवतो. जवळपास सगळीकडे असंच वागायचं हे आपल्या रक्तात भिनलं आहे.

ही बेशिस्तीची सवय आपल्याला भविष्यात बदलावी लागेल. जपान, कोरियासारख्या देशांकडून प्रत्येक गोष्टीसाठी संयम बाळगणं शिकावं लागेल. ‘मला घाई आहे’ म्हणून रांगेची शिस्त मोडणं योग्य नाही. रांगेत उभं राहायची त्यांची सवय अंगवळणी पाडून घ्यावी लागेल. कोरोनापासून स्वतःला दूर ठेवायचं तर झाडून सगळ्यांना हे करणं भाग आहे. भविष्यात शिस्त, रांग, अंतर हे आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली ठरणार आहे.