
कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांत 30 वरून 41 दिवसांवर गेला आहे. शिवाय दैनंदिन वाढही 2.30 वरून 1.72 टक्क्यांपर्यंत खाली आहे. यामुळे मुंबईकरील कोरोनाचे संकट रोखले जात असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
मुंबईत 11 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर दाटीवाटीच्या मुंबईत बाधित रुग्णांच्या निकट संपर्कात आल्याने रुग्णांची संख्या वेगाने वाढत गेली. यामुळे 22 मार्च रोजी फक्त तीन दिवसांतच रुग्ण दुप्पट होत होते. तर 15 एप्रिल रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 5 दिवस होता. 12 मेपर्यंत यात काहीशी वाढ होऊन रुग्ण दुपटीचा वेग 10 दिवसांवर पोहाचला. तर 2 जून रोजी 20 दिवस तर 16 जून रोजी 30 दिवसांपर्यंत वाढला. पालिकेच्या माध्यमातून ‘चेस द व्हायरस’ मोहिमेंतर्गत रुग्णांचा घेण्यात येणार शोध आणि रुग्णामागे 15 जणांना प्रभावी क्वारंटाईन, प्रभावी औषधोपचार, निर्जंतुकीकरण मोहीम यामुळेच रुग्णसंख्या आटोव्यात आल्याने रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आज 41 दिवसांवर गेला आहे.
24 पैकी 17 वॉर्ड 2 टक्क्यांवर आले
मुंबईत 17 जून रोजी सरासरी दररोज 2.30 टक्के कोरोना रुग्णवाढ होत होती. या दरात सकारात्मक घट होऊन हा दर 1.72 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यामध्ये मुंबईतील वॉर्डचा विचार केल्यास सर्वात कमी दैनंदिन वाढ एच पूर्व 0.7 टक्के, एफ उत्तर – 0.8 टक्के, ई – 0.9 टक्के इतकी खाली आली आहे. यामध्ये 24 पैकी 17 वॉर्डमधील दैनंदिन वाढ 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
वांद्रे पूर्वमध्ये डबलिंग रेट 97 दिवसांवर
वांद्रे पूर्व आणि खार पूर्व विभागाचा समावेश असलेल्या एच पूर्व विभागात कोरोना नियंत्रणाची सध्या सर्वोत्तम स्थिती आहे. एच पूर्वमध्ये कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट 97 दिवसांवर पोहोचला आहे. तर एफ उत्तर म्हणजेच माटुंगा येथे 91 दिवस, ई विभाग म्हणजेच भायखळा विभागात 76 दिवस, एल म्हणजेच कुर्ला विभागात 73 दिवस आणि फोर्ट-कुलाबा परिसर असलेल्या ‘ए’ विभागात डबलिंग रेट 69 दिवसांवर गेला आहे.



























































